मनुष्याला घडवणारी पुस्तके एकाकी; वाचकांनी पाठ फिरवल्याने अनेक ग्रंथालये ओस पडली

By विजय सरवदे | Published: August 14, 2023 07:11 PM2023-08-14T19:11:49+5:302023-08-14T19:13:00+5:30

वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी अनेक ग्रंथालये आहेत. पण, वाचकांनी पाठ फिरवल्यामुळे अशी ग्रंथालयेही आता शेवटच्या घटका मोजत आहेत.

Books that make a man are alone; Many libraries empty as readers turned away | मनुष्याला घडवणारी पुस्तके एकाकी; वाचकांनी पाठ फिरवल्याने अनेक ग्रंथालये ओस पडली

मनुष्याला घडवणारी पुस्तके एकाकी; वाचकांनी पाठ फिरवल्याने अनेक ग्रंथालये ओस पडली

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : असे म्हणतात की, पुस्तके माणसाला घडविण्याचे काम करतात. पण, हल्लीच्या जमान्यात टीव्ही, मोबाइलवर माणूस एवढा व्यस्त झाला आहे की त्याच्याकडे ग्रंथ चाळण्यासाठी वेळ आहेच कुठे? परिणामी, एकेकाळी हाऊसफुल असणारी ग्रंथालये आता ओस पडू लागली असून, अनेक वाचनालये तर केवळ अनुदानापुरतीच उरली आहेत.

ग्रंथालय दिनानिमित्त मराठवाड्यातील वाचनालयांचा आढावा घेतला असता विदारक चित्र समोर आले. शासकीय अनुदानासाठी आवश्यक असलेली वाचनालयांची सदस्य संख्या, ग्रंथसंख्या, वर्तमानपत्रे आदी अबाधित ठेवण्यास संचालक मंडळी प्रयत्न करताना दिसून येतात. पण, वाचनालयात येऊन ग्रंथ चाळणाऱ्यांची संख्या मात्र नगण्यच आहे. काही ‘क’ व ‘ड’ दर्जाची वाचनालये तर वाचकांच्या भरवशावर समोर कट्ट्यावर वर्तमानपत्रे ठेवून आपली ड्यूटी बजावतात. अनेक वाचनालयांचे दार तर काही महिने उघडलेलेच नसल्याचे वास्तव समाेर आले आहे. अनुदानाची रक्कम अदा करण्यापूर्वी तपासणीसाठी गेलेले ग्रंथालय निरीक्षक तास- दोन तासातच माघारी फिरतात. त्यामुळे वाचनालयांवर फारसा कोणाचा अंकुश दिसत नाही. याउलट वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी अनेक ग्रंथालये आहेत. पण, वाचकांनी पाठ फिरवल्यामुळे अशी ग्रंथालयेही आता शेवटच्या घटका मोजत आहेत. मराठवाड्यात आजच्या घडीला ३ हजार ८४९ वाचनालये तग धरून आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात ४००, बीड ६२८, हिंगोली २४५, जालना ३८८, लातूर ६७१, नांदेड ७२०, उस्मानाबाद ४२० आणि परभणी जिल्ह्यात ३७७ वाचनालयांचा समावेश आहे.

ग्रंथालयाची दर्जावाढ, नवीन मान्यता बंदच
ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक सुनील हुसे यांनी सांगितले की, शासनाने सन २०१२-१२ पासून राज्यातील ग्रंथालय चळवळीचे चित्र पाहून नवीन ग्रंथालयांना मान्यता व कार्यरत ग्रंथालयांना दर्जावाढ देणे बंद केलेले आहे. बौध्दिक आणि सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रंथालये चालली पाहिजेत आणि ती टिकलीही पाहिजेेत; पण मराठवाड्यासह सगळीकडचे चित्र फारसे समाधानकारक नाही. ग्रंथालये सुरू आहेत; पण अनेक ठिकाणी वाचकांचा प्रतिसादच नाही.

राज्यातील मॉडेल ग्रंथालय
महाराष्ट्रात दोनच मॉडेल ग्रंथालये असून, त्यापैकी एक येथील विभागीय शासकीय ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात १ लाख ९७ हजार ६६४ ग्रंथसंपदा असून, ९ हजारांहून अधिक सदस्य संख्या आहे. ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दालन आहे. त्यांच्यासाठी आवश्यक पुस्तक संख्याही मुबलक आहे. ३०-४० विद्यार्थी नियमितपणे अभ्यासासाठी येतात. दर्जावाढ कधी देणार? मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गुलाबराव मगर यांनी सांगितले की, गेल्यावर्षी वाचनालयांना अनुदानाची ६० टक्के वाढ दिली. अनुदानात तीनपट वाढ करावी, दर्जा वाढ आणि नवीन वाचनालयाला मान्यता देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

Web Title: Books that make a man are alone; Many libraries empty as readers turned away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.