रिअल इस्टेट ‘रिअल’मध्ये भारी; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार कोटींच्या उलाढालीची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:03 IST2024-12-10T14:03:02+5:302024-12-10T14:03:30+5:30

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आजवर मिळालेला महसूल हा मागील वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के इतकाच आहे.

boom in real estate; 7 thousand crore turnover in Chhatrapati Sambhaji Nagar | रिअल इस्टेट ‘रिअल’मध्ये भारी; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार कोटींच्या उलाढालीची भरारी

रिअल इस्टेट ‘रिअल’मध्ये भारी; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार कोटींच्या उलाढालीची भरारी

छत्रपती संभाजीनगर : रिअल इस्टेट रिअलमध्ये भारी असल्याचे गेल्या आठ महिन्यांतील खरेदी-विक्रीच्या आकड्यांतून दिसते आहे. ७ हजार कोटींची उलाढाल या क्षेत्रात झाली असून, ५८ हजार २४९ मालमत्तांची खरेदी विक्री शहर व परिसरात झाली आहे.

मुद्रांक नोंदणीच्या १३ कार्यालयातून रजिस्ट्री व्यवहारांतर्गत ४४४ कोटींचा महसूल मिळाला. प्लॉट, फ्लॅट, रो-हाऊस खरेदी विक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला. सुमारे ४३० कोटी रुपयांपर्यंतचा हा महसूल असून, १४ कोटी रुपयांचा महसूल इतर व्यवहारांतून मिळाला. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आजवर मिळालेला महसूल हा मागील वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के इतकाच आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांत ४८ टक्के महसूल या विभागाला मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास त्याचा खूप मोठा चांगला परिणाम रिअल इस्टेटवर होईल. डीएमआयसी, वाळूज सेक्टरची वाढ, रोजगारासाठीचे स्थलांतर देखील रिअल इस्टेटसाठी पोषक ठरणारे आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन हायवेदेखील या सेक्टरसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चारही बाजूंनी शहराचा विस्तार होत असला, तरी नियोजनबद्ध वसाहतींमध्ये घर घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलेले उलाढालीच्या आकड्यांवरून दिसते आहे. सर्वसाधारण ६ टक्के मनपा हद्दीबाहेर तर मनपा हद्दीत ७ टक्के महसूल मुद्रांक विभागाला आरआर रेटच्या तुलनेत होणाऱ्या रजिस्ट्रीमधून मिळतो.

महिलांना सवलतीचा लाभ...
निवासी मालमत्ता महिलांच्या नावावर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत २९१ महिलांच्या नावे निवासी मालमत्तांची दस्त नोंदणी झाली. त्या महिलांना या सवलतीचा लाभ झाल्याचा दावा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केला.

गेल्या वर्षी १० हजार कोटींची उलाढाल
१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात सुमारे दहा हजार कोटींची उलाढाल रिअल इस्टेटमध्ये झाली होती. यावर्षीचे आकडे पाहता पुढील चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे. २०२२ च्या तुलनेत दोन हजार कोटींनी उलाढाल एप्रिल २०२४ पर्यंत वाढली होती. जुने शहर, औरंगपुरा, समर्थनगर, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, गारखेडा परिसर, भावसिंगपुरा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, दर्गा, पैठण रोड, सूतगिरणी, चिकलठाणा, बीड बायपास, सातारा, देवळाई, वाळूज परिसरात रिअल इस्टेटची ‘बूम’ पाहायला मिळते आहे.

Web Title: boom in real estate; 7 thousand crore turnover in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.