कंटाळा विद्यार्थ्यांना, दोष मात्र यंत्रणेला; ४० दिवसांत फक्त १४३७ विद्यार्थ्यांचेच शिष्यवृत्ती अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 07:34 PM2022-01-28T19:34:21+5:302022-01-28T19:35:01+5:30
समाजकल्याण विभागाने १४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती भरण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले. हे अर्ज सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अखेरची मुदत जाहीर केली आहे.
औरंगाबाद : भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेप्रती मागासवर्गीय विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयांची कमालीची उदासिनता दिसून येत आहे. समाज कल्याण विभागाने ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली असताना ४० दिवसांत जिल्ह्यातील केवळ १४३७ महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज परिपूर्ण भरले आहेत. तथापि, गेल्या वर्षी ६५ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला होता. समाजकल्याण विभागाने १४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती भरण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले. हे अर्ज सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अखेरची मुदत जाहीर केली आहे. मात्र, एससी, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ५ जानेवारीपासून महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी गावी परतले.
असे असले तरी शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना कोठूनही भरता येतो. मात्र, जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेच नाहीत. अनुसूचित जातीच्या १४६१९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. मात्र, यापैकी १०७७ विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज महाविद्यालयांनी मंजूर केले. १३ हजार ५४२ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील १४०६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यापैकी अवघ्या ३६० विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर केले. १३७०१ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज भरलेले नसतील, तर महाविद्यालयांनी अर्जातील त्रुटीबाबत विद्यार्थ्यांना तसे अवगत करायला हवे होते; परंतु अनेक महाविद्यालयांनी त्याबाबत उदासिनता दाखविलेली आहे. यासंदर्भात समाजकल्याण विभागाने नाराजी व्यक्त केली असून शिष्यवृत्ती योजनेपासून एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याला सर्वस्व महाविद्यालये जबाबदार असतील, असा इशारा समाजकल्याण सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी दिला आहे.
मागील वर्षी किती विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील एकूण ६५ हजार ६२५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला. यापैकी अनुसूचित जातीचे २९ हजार ९६२ विद्यार्थी असून त्यांच्या खात्यात १५ कोटी २० लाख ६० हजार ९५८ रुपये शिष्यवृत्ती जमा करण्यात आली, तर विजाभज, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय प्रवर्गाच्या ३५ हजार ६६३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १० कोटी ६८ लाख ३२ हजार ३६८ रुपयांची शिष्यवृत्ती जमा करण्यात आली.