नोकरीचा कंटाळा, दोन सख्खे शेजारी, बेरोजगार डिप्लोमा होल्डर बनले सोनसाखळी चोर

By सुमित डोळे | Published: July 27, 2024 07:43 PM2024-07-27T19:43:40+5:302024-07-27T19:44:06+5:30

सोनसाखळीवर गोल्ड लोन घेतले, एकाने फ्लॅटचे हप्ते फेडले तर दुसऱ्याने अय्याशित उडवले; व्हॉट्सॲप चॅटवरही संवाद

Bored with job, two close neighbors, unemployed diploma holder turned gold chain thief | नोकरीचा कंटाळा, दोन सख्खे शेजारी, बेरोजगार डिप्लोमा होल्डर बनले सोनसाखळी चोर

नोकरीचा कंटाळा, दोन सख्खे शेजारी, बेरोजगार डिप्लोमा होल्डर बनले सोनसाखळी चोर

छत्रपती संभाजीनगर : एकाचे पहिले संगणकाचे दुकान बंद पडले. परिणामी, नव्याने घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते थकले. त्याचा सख्खा शेजारीही नोकरी शोधून कंटाळला होता. रोज सोनसाखळी चोरीच्या बातम्या वाचून पहिल्या मित्राने तशीच चोरी करण्याचे ठरवले. शेजाऱ्यालाही त्यासाठी तयार केले अन् दोघांचे सोनसाखळी चोरीचे दोन प्रयत्न यशस्वी झाले. आत्मविश्वास वाढल्याने व्हॉट्सॲप चॅटवर शनिवारी सोनसाखळी हिसकावण्याचे नियोजनही केले. परंतु गुरुवारी त्याआधीच गुन्हे शाखेने दोघांच्या मुसक्या आवळून अटक केली. विजय अर्जुन ठाणगे (३४) व आकाश सुरेश जाधव (२४, दोघेही रा. शंभुनगर) अशी दोघांची नावे आहेत.

२२ मे रोजी सकाळी ७ वाजता बीड बायपासवर निशांत पार्क हॉटेल मागे प्रणिता कुलकर्णी यांचे १ तोळ्याचे गंठण तर २७ जून रोजी सकाळी वाजता प्रतिभा जोशी यांचे २ तोळ्यांचे मंगळसूत्र चोरांनी हिसकावून नेले हाेते. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, सहायक निरीक्षक विनायक शेळके यांनी बारकाईने तपास सुरू केला. दोन्ही घटनेत चोरांची चालण्याची पद्धत, अंगाची ठेवण एकच असल्याचे निष्पन्न झाले. एकाच परिसरात, एकाच पद्धतीने चोरी झाल्याने चोर आसपासचे असल्याचा अंदाज पथकाला आला. अंमलदार संजय गावंडे, गजानन मांटे, कैलास काकडे, विलास मुठे, राजाराम डाखुरे, संदीप सानप, विलास कोतकर यांनी पायी फिरत विचारपूस केली. त्यात तपास शंभूनगरपर्यंत पोहोचला. चोरी करणारे विजय व आकाश हे दोघे शेजारी मित्रच असल्याचे निष्पन्न झाले.

हप्ते फेडण्यासह घर चालवण्याचे संकट
विजयने बारावीनंतर हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स करून संगणकाचे दुकान टाकले होते. उत्पन्न चांगले असल्याने साताऱ्यात कर्जावर २५ लाखांचा फ्लॅट विकत घेतला. मात्र, नंतर व्यवसायात तोट्यात गेला. त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करून अपयश आले. हप्ते फेडण्यासह घर चालवण्याचे संकट उभे राहिले. त्याचे आई-वडील किराणा दुकान चालवतात. तर त्याच्याच शेजारी राहणारा आकाश पॉलिटेक्निक डिप्लोमा उत्तीर्ण आहे. सहा महिने तो बेरोजगार होता. त्यामुळे डोक्यात चोरीची सुपीक कल्पना सुचली आणि दोघांनी गुन्हे क्षेत्रात प्रवेश केला. आकाश नुकतेच चितेगावच्या नामांकित इलेक्ट्रिकल कंपनीत नोकरीला लागला होता.

सोनसाखळीवर गोल्ड लाेन घेतले
विजयने घराचे हप्ते फेडण्यासाठी गोल्ड फायनान्स कंपनीत पहिली सोनसाखळी गहाण ठेवून ७८ हजारांचे तर दुसरी सोनसाखळी ठेवून ६९ हजारांचे पत्नीच्या नावे कर्ज उचलले. त्यापैकी ५० टक्के वाटा आकाशला दिला व उर्वरित रकमेतून हप्ते फेडत होता. मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने बाहेर पडून ते चोरीसाठी महिलांचा शोध घेत होते. येत्या शनिवारसाठी व्हॉट्सॲप चॅटिंगवर 'नया कस्टमर ढुंढेंगे' या कोड भाषेत चोरीचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच दोघांची तुरुंगात रवानगी झाली.

Web Title: Bored with job, two close neighbors, unemployed diploma holder turned gold chain thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.