जन्मदात्याने कालविले भाकरीच्या पिठात विष, तीन मुलांचा मृत्यू; पत्नी अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:51 AM2017-11-23T05:51:19+5:302017-11-23T05:51:35+5:30
सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. न्हावी तांडा येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला. घरातील ताणतणाव किंवा आर्थिक चणचणीतून शेतकºयाने कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा गावात आहे.
पिठात विष कालवल्यानंतर फरार झालेल्या राजू रतन राठोड यास बुधवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तो काहीही बोलत नसल्याने व याप्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजू हा पत्नी कावेरीबाई (३२), मुलगी ज्योती (१३), गोगली (८) व मुलगा राहुल (१०) यांच्यासह राहत होता. पत्नी शेतातून येण्याच्या आधी सोमवारी सायंकाळी त्याने घर गाठले. डब्यातील ज्वारीच्या पिठात विष कालवले. कावेरीबाई यांनी नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. संपूर्ण कुटुंबाने व शेजारील दिनेश राठोडनेही त्यांच्याकडेच जेवण केले. मात्र राजू हा नंतर जेवतो म्हणून घरातून गेला तो परत आलाच नाही. मध्यरात्री पाचही जणांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक झाल्याने सर्वांना जळगावचे सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्योती व गोगली यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला, तर बुधवारी रात्री राहुल याचाही मृत्यू झाला. कावेरीबाई व दिनेश मृत्यूशी झुंज देत आहेत.
>कारण अस्पष्ट
जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण सोयगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार बुधवारी धिंगापूर धरणाजवळ लपून बसलेल्या राजू यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पिठात विष का कालवले, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत कुणीही फिर्याद दिली नसल्याने आम्ही अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.