मराठी भाषेची जननी मराठवाडाच; अजिंठ्याच्या डोंगररांगा, गोदावरी खोऱ्यातील जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:19 PM2023-01-24T17:19:51+5:302023-01-24T17:20:44+5:30

यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली

Born in Marathwada, the motherland of Marathi language, Ajintha hills, Godavari valley: Koutikrao thale patil | मराठी भाषेची जननी मराठवाडाच; अजिंठ्याच्या डोंगररांगा, गोदावरी खोऱ्यातील जन्म

मराठी भाषेची जननी मराठवाडाच; अजिंठ्याच्या डोंगररांगा, गोदावरी खोऱ्यातील जन्म

googlenewsNext

औरंगाबाद :मराठी भाषेचा जन्म हा अजिंठ्याच्या डोंगररांगा व गोदावरी खोऱ्यातील भूभाग अर्थात मराठवाड्यात झाला. आजच्या प्रमाण मराठी भाषेतील रूपे ही मराठवाड्याच्या मराठी भाषेतील आद्यरूपे आहेत, असे प्रतिपादन मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. तर औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्य परंपरेतील संत बहिणाबाई, निळोबाराय, शाहीर विश्राम पाटील यांच्यावर संशोधनाची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभाग व भाषा संचालनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित जागर मराठीचा या कार्यक्रमात बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्याची साहित्य व सांस्कृतिक परंपरा या विषयावर उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. मंचावर विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य, भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाचे बाबासाहेब जगताप, कवी हबीब भंडारे व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते.

ठाले पाटील म्हणाले, शालिवाहन काळापासून पैठण हे सर्व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र होते. बौद्ध धर्माच्या चार केंद्रांपैकी अजिंठा हे एक केंद्र होते. यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली; परंतु हेमाद्री पंडिताने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाद्वारे कर्मकांडाचे स्तोम वाढवले. मराठवाड्यातील ब्राह्मण उदार होते म्हणून ते चळवळीत आले. परिणामी मराठवाड्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ निर्माण झाली नाही.

गावात अन् नावात काय असते, ही भावना चुकीची
प्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य यांनी स्वतःचे नाव, गाव यांनाही एक सांस्कृतिक परंपरा असते. ती स्व जाणीव ओळखण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराबद्दल कवी हबीब भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विलास गायकवाड यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. डाॅ. सुधाकर शेंडगे, प्रिया धारुरकर, प्रा. रामेश्वर वाकणकर यांच्यासह विद्यार्थी, संशोधकांची उपस्थिती होती.

Web Title: Born in Marathwada, the motherland of Marathi language, Ajintha hills, Godavari valley: Koutikrao thale patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.