सहकारी महिलेवर अत्याचार करणारा बॉस अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:34 AM2017-10-30T01:34:10+5:302017-10-30T01:34:15+5:30
सहकारी महिलेला ब्लॅकमेल करून चार वर्षे अत्याचार करणा-या तत्कालीन बॉसला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सहकारी महिलेला ब्लॅकमेल करून चार वर्षे अत्याचार करणा-या तत्कालीन बॉसला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
मिलिंद बाबूलाल माळी (४६,रा. रघुवीरनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना जिन्सी पोलिसांनी सांगितले की, शहरातील एका कंपनीच्या कार्यालयात आरोपी मानव संसाधन विभागात (एच.आर) तर पीडिता स्वागतकक्षात कार्यरत होती. सप्टेंबर २०१२ मध्ये महालक्ष्मीनिमित्त पत्नीने हळदी-कुंकवासाठी बोलावल्याची थाप मारून त्याने पीडितेला घरी बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्या घरी ना महालक्ष्मी होती ना त्याची पत्नी. तेथे तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. ती अर्धवट शुद्ध हरपलेल्या अवस्थेत जाताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तेव्हापासून डिसेंबर २०१६ पर्यंत आरोपीची पत्नी घरी नसताना तो तिला धमकावून घरी बोलावून घेत आणि अत्याचार करीत. या कालावधीत त्याने तिचे अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ही छायाचित्र पीडितेच्या पतीला दाखवेल आणि इंटरनेटवर टाकून बदनामी करण्याची धमकी देत तो तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत. त्याच्या या त्रासातून मुक्तता करण्यासाठी पीडितेने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि अनेकदा मोबाइलनंबरही बदलले. मात्र, तो तिच्या नवीन नोकरीच्या ठिकाणी जात आणि तिचा मोबाइलनंबर मिळवून तिला संसार मोडण्याची धमकी देत. पीडितेची ड्यूटी संपण्याच्या वेळी तो कार घेऊन रस्त्यावर येऊन उभा राहत. तिला बळजबरीने कारमध्ये बसवून घेऊन जात. त्याचा त्रास थांबत नसल्याने शेवटी तिने पतीला विश्वासात घेऊन झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पतीने तिला धीर देत याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे सांगितले. २८ आॅक्टोबर रोजी जिन्सी पोलिसांनी आरोपी माळीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.
न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी दिली.