वैद्यकीय शिक्षणासाठी दोन्ही मुलांप्रमाणे पित्याची देहदानाची इच्छा राहिली अधुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:53 PM2020-10-23T18:53:39+5:302020-10-23T18:56:05+5:30
नैसर्गिक मृत्यू, आजाराने मृत्यू, असे प्रमाणपत्र पाहिजे, तरच देहदान स्वीकारता येते.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दोन मुलांचे देहदान करणाऱ्या पित्याचीच गुरुवारी मृत्यूनंतर देहदानाची अखेरची इच्छा अपूर्ण राहिली. या पित्याने दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांचे देहदान केले होते. मुलांप्रमाणे आपलेही देहदान व्हावे, अशी त्यांची इच्छा होती; परंतु परिस्थितीमुळे त्यांचे देहदान टळले. याविषयी नातेवाईक आणि देहदान चळवळीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
सोहनराज बोरा (७८, रा. युथ हॉस्टेल परिसर) असे या पित्याचे नाव आहे. त्यांचे गुरुवारी निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या छोट्या मुलाचे २०१७ आणि मोठ्या मुलाचे २०१८ मध्ये निधन झाले. तेव्हा वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने सोहनराज बोरा यांनी त्यांचे देहदान केले होते. मुलांप्रमाणे मृत्यूनंतर माझा देहही वैद्यकीय शिक्षणासाठी द्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचे नातेवाईक दिलीप मुगदिया यांनी देहदानासाठी राजेशसिंह सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील, डॉ. मंगेश मोरे, प्रा. चंपालाल कहाटे यांनी घाटी आणि शहरातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांशी संपर्क केला. देहदानासाठी सर्व पातळीवरून प्रयत्न करण्यात आले; परंतु नैसर्गिक मृत्यू, मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने देहदानास संमती मिळाली नाही. त्यामुळे अखेर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
नेत्रदानाची इच्छा पूर्ण
सूर्यवंशी म्हणाले, देहदानाला प्रोत्साहन देण्याची गरज असताना नकार देण्यात आला. दिलीप मुगदिया म्हणाले, अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदान होऊ शकले नाही; परंतु किमान नेत्रदान झाले.
आजार नमूद गरजेचे
घरी मृत आढळले, असे कारण त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले होते. नैसर्गिक मृत्यू, आजाराने मृत्यू, असे प्रमाणपत्र पाहिजे, तरच देहदान स्वीकारता येते. सदर प्रमाणपत्र वरिष्ठांनाही दाखविले; परंतु मृत्यूचे कारण नमूद नसल्याने देहदान घेता आले नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले.