१५ जूनपर्यंत दोन्ही उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुले
By Admin | Published: June 5, 2016 11:44 PM2016-06-05T23:44:07+5:302016-06-05T23:55:52+5:30
औरंगाबाद : जालना रोडवरील बहुचर्चित महावीर चौक, रेल्वेस्टेशन रोड आणि वसंतराव नाईक चौक, सिडको हे दोन्ही उड्डाणपूल १५ जूनपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले होण्याचे संकेत उपअभियंता उदय भरडे यांनी दिले.
औरंगाबाद : जालना रोडवरील बहुचर्चित महावीर चौक, रेल्वेस्टेशन रोड आणि वसंतराव नाईक चौक, सिडको हे दोन्ही उड्डाणपूल १५ जूनपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले होण्याचे संकेत उपअभियंता उदय भरडे यांनी दिले. पथदिवे आणि स्ट्रीट गाईड पॅच मारण्याचे काम बाकी आहे. ते काम या आठवड्यात संपेल. त्यानंतर १५ जूनपर्यंत पूल खुला होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. अडीच वर्षांपासून त्या पुलांचे काम सुरू आहे.
महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम झाले असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाचे काम अजून बाकी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला आणि मनपात भूसंपादनावरून सध्या पत्रव्यवहार सुरू आहे. रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक या रोडवर तो पूल बांधण्यात आला आहे. मुळात वाहतुकीचा रेटा हा नगरनाका ते जालना रोड या दिशेने होता. त्यामुळे पूल या दिशेने बांधला जावा, अशी मागणी पुढे आली. या मागणीसाठी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली; परंतु पुलाची दिशा बदलली नाही. सिडकोउड्डाणपुलाची लांबी वाढण्याच्या वादामुळे ते काम रखडले. मंजूर आराखड्याइतकेच काम करण्याचे ठरल्यानंतर पुलाचे काम झाले. या पुलामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे सध्या तरी वाटत नाही. अतिशय किचकट अशा स्वरूपाची वाहतूक व्यवस्था सध्या नाईक चौकात पाहण्यास मिळते.
राष्ट्रवादीचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित देशमुख यांनी सात दिवसांत पूल वाहतुकीला खुला न केल्यास अनाथ मुलांच्या हस्ते पूलाचे उद्घाटन करण्याचा इशारा एमएसआरडीसीला निवेदनातून दिला आहे.