सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 12:23 PM2021-08-02T12:23:26+5:302021-08-02T12:24:17+5:30
वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल देवडे आणि डॉ. देशराज मीना या दोघांनी राजीनामे जिल्हाशल्य चिकित्सक आणि तहसीलदार सोयगाव यांचेकडे सादर केले आहे.
सोयगाव ( औरंगाबाद ) : सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिक्त असलेली पदे आणि कामांचा वाढलेला व्याप व रुग्णसंख्येत झालेली वाढ या कारणांमुळे रविवारी तडकाफडकी राजीनामे जिल्हा शल्य चिकित्सक औरंगाबाद यांना सादर केल्याने आता सोयगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना झाले आहे. ऐन कोरोना संसार्गाच्या तिसऱ्या लाटेत आणि कोविड लसीकरणाच्या गतिमान प्रक्रियेत अडचणी निर्माण झाली आहे.
जिल्ह्यासह राज्यात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना या संकटाच्या तोंडावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल देवडे आणि डॉ. देशराज मीना या दोघांनी राजीनामे जिल्हाशल्य चिकित्सक आणि तहसीलदार सोयगाव यांचेकडे सादर केले आहे. या पूर्वीच सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे यांचा करार आठवड्यापूर्वी संपलेला आहे.त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक विभागाने अद्यापही पूर्ववत करून घेतलेले नसल्याने सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार अनियंत्रित झालेला आहे. तापेच्या रुग्णांची वाढती संख्या आणि रिक्त असलेली पदे यामुळे कामांचा व्याप वाढलेला असल्याने राजीनामे सादर केले असल्याचे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. जिल्हा प्रशासनाचे सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. ऐन तिसऱ्या लाटेचं तोंडावर सोयगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना झालेले असून नुकतेच सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला कोविड केंद्राचा दर्जा प्राप्त झालेला असल्याने आगामी काळातील रुग्णांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडे झालेला आहे परंतु सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारीच राहणार नसल्याने सोयगावकरांना तिसऱ्या लाटेची चिंता पडलेली आहे.
शहरात कोविड लसीकरण बंद
वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आठवड्यापासून शहरातील नागरिक कोविड लसीकरणापासून वंचित आहे आठवडाभरापूर्वी सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला पाठविण्यात आलेला कोविड लसीकरणाचा साठा अद्यापही पडून असल्याने तब्बल दोनशे कोविड डोसेस धूळखात पडून आहे.सोयगाव परिसरात नुकतीच मलेरिया आणि तापेची साथ सुरु झालेली आहे त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.सोयगावचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला असूनही याकडे तालुका प्रशासनासह जिल्हा शल्य विभागाने कानाडोळा केला आहे.
कोविड चाचण्या ठप्प
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात तातडीने कोविड चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आढावा बैतःकीत दिले आहे परंतु सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे यांचा करार संपल्याने सोयगावला कोविड चाचण्याही ठप्प झाल्या आहे.