मॉर्निंग वॉकला जाणा-या दोघांना चिरडले : एकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:02 AM2018-01-10T01:02:19+5:302018-01-10T01:02:21+5:30
मॉर्निंग वॉकला जाणा-या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सोलापूर-धुळे मार्गावरील पळसवाडी गावाजवळ घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : मॉर्निंग वॉकला जाणा-या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सोलापूर-धुळे मार्गावरील पळसवाडी गावाजवळ घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सोमीनाथ शहादू देवरे (५१, रा. पळसवाडी) असे अपघातातील मयताचे नाव आहे, तर उत्तम गंगाधर ठेंगडे (५६, रा. पळसवाडी) असे गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे. बांधकाम मिस्तरी असलेले देवरे व महावितरणचे लाईनमन ठेंगडे हे नेहमी सकाळी सोलापूर-धुळे मार्गावर मॉर्निंग वॉकला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ. बाबासाहेब थोरात, वाल्मीक कांबळे, हनुमंत सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, देवरे यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजता पळसवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अज्ञात वाहनाचा शोध सुरू
नित्याप्रमाणे मंगळवारी हे दोघे मॉर्निंग वॉकला निघाले असता सकाळी ६.३० वाजता पाठीमागून येणारे अज्ञात वाहन दोघांना चिरडून सुसाट वेगाने निघून गेले. या दुर्घटनेत सोमीनाथ देवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर उत्तम ठेंगडे गंभीर जखमी असून, त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.