व्यापा-याला लुटणा-या दोघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 09:55 PM2019-02-22T21:55:00+5:302019-02-22T21:57:54+5:30
व्यापाºयाला लुटल्याच्या गुन्ह्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहम्मद यांनी आरोपी वाजेद ऊर्फ बबला असद ऊर्फ मोहसीन (२५) व त्याचा साथीदार जावेद पठाण ऊर्फ जवा रफिक पठाण या दोघांना प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १५ हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : व्यापाºयाला लुटल्याच्या गुन्ह्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहम्मद यांनी आरोपी वाजेद ऊर्फ बबला असद ऊर्फ मोहसीन (२५) व त्याचा साथीदार जावेद पठाण ऊर्फ जवा रफिक पठाण या दोघांना प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम फिर्यादीला देण्याचेही आदेशात म्हटले आहे.
टीव्ही सेंटर येथील किराणा व्यापारी राजेंद्र हिरालाल खंडेलवाल (५७) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, ५ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ते हिमायतबागेत फिरायला गेले असता, वरील दोन्ही आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील सात हजार रुपये व मोबाईल हिसकावला, तसेच त्यांच्याकडील दुचाकीची चावी हिसकावून नेली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३९४ आणि २०१ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी जावेद पठाण याला अटक केली. त्याच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी १,५०० रुपये जप्त केले. फिर्यादीचा मोबाईल आरोपींनी जवळच्या तलावात फेकला होता. तोही ताब्यात घेतला.
सुनावणीदरम्यान, सहायक सरकारी वकील भागवत काकडे पाटील यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यातील चार साक्षीदार फितूर झाले. न्यायालयाने सुनावणीअंती, दोन्ही आरोपींना भा.दं.वि. कलम ३९४ अन्वये प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, तसेच कलम २०१ अन्वये, प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास आणि अडीच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाचे एकूण १५ हजार रुपये, तसेच लुटीचे एक हजार ५०० रुपये फिर्यादीला देण्याचे आदेशात म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. शिंदे यांनी तपास केला, तर पैरवी अधिकारी पंकज चौधरी यांनी साहाय्य केले.