विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विकास मंचचे दोन्ही उमेदवार विजयी

By विजय सरवदे | Published: October 2, 2023 12:39 PM2023-10-02T12:39:02+5:302023-10-02T12:39:24+5:30

अटीतटीच्या लढतीत पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचा दणदणीत पराभव

Both the Vikas Manch candidates won the University Management Council election | विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विकास मंचचे दोन्ही उमेदवार विजयी

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विकास मंचचे दोन्ही उमेदवार विजयी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदेतील दोन सदस्य निवडून देण्यासाठी शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे डॉ. व्यंकट लांब व डॉ. अपर्णा पाटील हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यांनी पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचा दणदणीत पराभव केला.

विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात शनिवारी विद्या परिषदेची बैठक झाली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी नवनियुक्त १७ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर १२ ते १ वाजेदरम्यान मतदान झाले व मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी ६० पैकी उपस्थित ५५ सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. येवले यांनी सर्वांत अगोदर, तर कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सर्वात शेवटी मतदान केले.

या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे डॉ. व्यंकट बजरंग लांब यांंनी ३५ मते घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे डॉ. राजेश लहाने यांचा पराभव केला. त्यांना २० मते मिळाली. दुसऱ्या उमेदवार विकास मंचच्या डॉ. अपर्णा हिंमतराव पाटील यांनी ३७ मते घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या डॉ. रेखा मोहन गुळवे यांचा दणदणीत पराभव केला. त्यांना १८ मते मिळाली.
या निवडणुकीसाठी महात्मा फुले सभागृहात मतदान झाले, तर व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीसाठी छाननी समिती सदस्य म्हणून डॉ. सचिन देशमुख, डॉ. वैभव मुरुमकर, डॉ. नवनाथ आघाव यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी निकाल घोषित केला. कुलगुरुंच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्या परिषदेवर डॉ. सर्जेराव जिगे हे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, तर डॉ. अपर्णा पाटील या हिंदी अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. आता व्यवस्थापन परिषदेवर डॉ. पाटील विजयी झाल्या आहेत. डॉ. जिगे व डॉ. अपर्णा पाटील हे दाम्पत्य पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात कार्यरत असून दोघेही पहिल्यादांच विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून आले आहेत.

अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण
आता विद्यापीठाच्या सर्व अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात अधिसभा व अभ्यास मंडळ सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेसाठी निवडणूक झाली, तर तिसऱ्या टप्प्यात या दोन जागांसाठी निवडणूक झाली.

Web Title: Both the Vikas Manch candidates won the University Management Council election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.