दोघींच्या नावे केली ७५ हजारांची मुदत ठेव
By Admin | Published: March 27, 2017 11:48 PM2017-03-27T23:48:08+5:302017-03-27T23:52:04+5:30
उस्मानाबाद : अवयव दान करणाऱ्या शिवपार्थ कोळी या बालकाच्या कुटुंबातील दोन मुलींच्या नावे अखिल भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या जिल्हा शाखेने ७५ हजारांची दामदुप्पट मुदतठेव ठेवली आहे.
उस्मानाबाद : लहान वयात अवयव दान करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या येथील शिवपार्थ कोळी या बालकाच्या कुटुंबातील दोन मुलींच्या नावे अखिल भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या जिल्हा शाखेने ७५ हजारांची दामदुप्पट मुदतठेव ठेवली आहे.
मोलमजुरी करणाऱ्या शिवशंकर कोळी यांचा मुलगा शिवपार्थ (वय १४) याचा महिनाभरापूर्वी अल्पशा आजाराने मृत्यू झाला. यानंतर त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय शिवशंकर कोळी यांनी घेतला. याबाबत कुटुंबियांना माहिती देवून त्यांनी एकुलत्याएक मुलाचे सोलापूर येथील अश्विनी रूग्णालयात अवयवदान केले. त्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने सोमवारी शाहूनगर येथील कोळी कुटूंबियांची भेट घेवून गौरी शिवशंकर कोळी (वय १४) व राधा शिवशंकर कोळी (वय ९) या दोघींच्या नावे प्रत्येकी ३७ हजार ५०० रूपयांचे मुदतठेव प्रमाणपत्र स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुनिता माने यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज घोगरे, उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय खुने, डॉ. अभिजीत बागल, सहसचिव डॉ. मुकूंद माने यांच्यासह ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. अभय शहापूरकर, डॉ. सुधीर मुळे, डॉ. श्रीनिवास हंबीरे, डॉ. सचिन रामढवे, आदींची उपस्थिती होती.