गांधीनगरात क्षुल्लक कारणावरून दोघांना भोसकले
By Admin | Published: July 17, 2017 05:50 PM2017-07-17T17:50:47+5:302017-07-17T17:50:47+5:30
आई-बहिणीवरुन शिवी दिली या किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री गांधीनगर येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद: आई-बहिणीवरुन शिवी दिली या किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री गांधीनगर येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका परिवाराने दुस-या परिवारावर लाठ्या-काठ्यासह तलवार, चाकूने हल्ला चढवला. हल्ल्यात चोघे जखमी झाली असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर आणि पोलीस निरीक्षक अनिल आडे म्हणाले की, संदीप मदनलाल कागडा(३१,रा. गांधीनगर) हा रविवारी (दि. १६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गांधीनगर येथील जागृत हनुमान मंदीराजवळील ओट्यावर बसलेला होता. यावेळी त्याच्याशेजारी काही अंतरावर असलेल्या राहुल उर्फ डुड्डा कागडा हा संदीपचे नाव घेऊन त्यास आई -बहिणीवरुन शिव्या देऊ लागला. याचा संदीपला राग आल्याने त्याने शिव्या देऊ नको, असे सांगितले. यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद सुरू असतानाच राहुलचे वडिल राममहेर हे अचानक घरातून तलवार घेऊन आले आणि त्यांनी संदीपवर वार केला. संदीपच्या आवाजाने त्याचा भाऊ नितीन कागदा, मामा गणेश चावरिया आणि पत्नी सोनिया कागडा तेथे आले. त्यांना पाहताच राहुल ने गणेश यांच्या पोटावर चाकूने वार केला तर मनोज, करण, अजय व नरेंद्र यांनी नितीन व सोनिया यांच्यावर लाठ्या- काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला केला. यात संदीप व गणेश गंभीर जखमी आहेत.
याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. राहुल उर्फ डुड्डा राममहेर कागडा, राममहेर कागडा, करण उर्फ बब्बल रामपाल कागडा, अजय प्रेम कागडा आणि नरेंद्र राममहेर कागडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर प्रेम हरिकिशन कागडा आणि मिन्नू उर्फ मनोज हरिकिशन कागडा(सर्व रा. गांधीनगर) हे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.