बाटली महागड्या ब्रँडची,आत हलकी दारू; छत्रपती संभाजीनगरात दारूत भेसळ करणारे रॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:23 IST2024-08-10T13:22:49+5:302024-08-10T13:23:11+5:30
गोव्याच्या दारूची तस्करी; बाटलीचे आवरण महागडे आतमध्ये हलकी दारू; राज्य उत्पादन शूल्क विभागाच्या कारवाईत ४० बॉक्ससह तीन तस्करांना अटक

बाटली महागड्या ब्रँडची,आत हलकी दारू; छत्रपती संभाजीनगरात दारूत भेसळ करणारे रॅकेट
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील काही ढाबे, बारमध्ये दारूची बाटली महागडी असली, तरी आतील दारू तीच असेल याची शाश्वती नाही. कारण, गोव्यावरून स्वस्त दारूची तस्करी करून इकडे महागड्या बाटलीत भेसळ करून पुरवणारे रॅकेट उघडकीस आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन तस्करांना अटक करत त्यांच्या ताब्यातून २० बॉक्स दारू ताब्यात घेतले.
अधीक्षक संतोष झगडे, निरीक्षक आनंद चौधरी यांना या रॅकेटविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी रात्री सिल्लोड परिसरातील घाटनांद्रा शिवारात सापळा रचला होता. गुप्तबातमीदाराच्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची सफारी कार जाताना आढळताच पथकाने पाठलाग करून त्यांना अडवले. गाडीत गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात बंदी असलेल्या दारूंच्या बाटल्यांचे २० बॉक्स आढळून आले. याची तस्करी करणारे गोकुळ विष्णू पाटील, जितेंद्र युवराज यादव व उमेश शशिकांत पाटील (तिघेही रा. ता. पाचोरा, जळगाव) यांना पथकाने तत्काळ ताब्यात घेत अटक केली. निरीक्षक आनंद चौधरी, अशोक साळुंखे, ए. ई. तातळे, पी. व्ही. मुंगडे, आर. एम. भारती, कृष्णा पाटील, एच. ए. बारी, एस. एम. कादरी, एस. एस. खरात, बी. सी किरवले, मोतीलाल बहुरे, एस. जी. मुपडे यांनी कारवाई पार पाडली.
भेसळीचा दाट संशय
गोव्यात अन्य राज्यांंच्या तुलनेत दारूच्या किमती कमी आहेत. त्यामुळे तेथील १८० एमएलच्या ७० रुपयांची दारूची तस्करी करण्यात येते. माल्ट व्हिस्की म्हणून इकडे तिची ५०० ते ६०० रुपयांपर्यंत विक्री केली जाते. जिल्ह्यातील अनेक धाबे, बारमध्ये ग्राहकाने मागवलेल्या महागड्या दारूच्या नावाखाली हीच दारू पुरवली जात असल्याचा दाट संशय अधिकाऱ्यांना आहे.
पथकाद्वारे नियमित तपासणी
अवैध मद्य तस्करी, भेसळ प्रकार, अवैध दारू विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी अधीक्षक संतोष झगडे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाद्वारे नियमित जिल्ह्यातील सर्व ढाबे, बारची तपासणी केली जाणार आहे.