हवाई सेवेच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:46 PM2019-04-18T23:46:23+5:302019-04-18T23:47:08+5:30
मराठवाड्याच्या हवाई उड्डाणाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे औरंगाबादला पर्यटन आणि उद्योग विकासाची नवनवीन दालने खुली झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत हवाई सेवेचा विकास अन् विस्ताराच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ बसली आहे. नवीन विमानसेवा सुरू होण्याऐवजी एक-एक विमान पडत आहेत. विमानतळाचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा, एअर अॅम्ब्युलन्स आदी सेवा कागदावरच आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्याच्या हवाई उड्डाणाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे औरंगाबादला पर्यटन आणि उद्योग विकासाची नवनवीन दालने खुली झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत हवाई सेवेचा विकास अन् विस्ताराच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ बसली आहे. नवीन विमानसेवा सुरू होण्याऐवजी एक-एक विमान पडत आहेत. विमानतळाचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा, एअर अॅम्ब्युलन्स आदी सेवा कागदावरच आहेत.
केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले. एअर इंडिया, ट्रूजेट आणि जेट एअरवेज कंपनीच्या विमानसेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. मात्र, आता जेट एअरवेजची सेवा बंद झाली. परिणामी केवळ दोन कंपन्यांचीच सेवा उरली.
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. औरंगाबाद देशातील १८ विमानतळांच्या अंतर्गत आहे. ज्यात आशियाई देशांशी द्विपक्षीय करार आहे. औरंगाबाद विमानतळावरून श्रीलंका येथील पर्यटक अजिंठा, वेरूळ लेणीला भेट देतात. इतर देशातील पर्यटक पर्यटनासोबतच वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न हवेत. त्यासाठी विमानसेवेत वाढ होणे आवश्यक आहे. ‘उडान’ योजनेत समावेश होऊनही सेवा सुरू होत नाही.
शहराच्या वाढणाºया विस्तारामुळे प्रवाशांची मागणी, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात होणारी विदेशी गुंतवणूक, त्यामुळे देश-विदेशातील उद्योगांसाठी आवश्यक असणारी विमानसेवा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी १८२ एकर जमिनीची मागणी प्राधिकरणाकडून सरकारकडे करण्यात आली. त्याला मान्यताही मिळाली. प्रत्यक्षात विस्तारीक रण रेंगाळलेले आहे.
विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. एका एजन्सीच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले; परंतु अजूनही ही सेवा कागदावरच आहे. जेट एअरवेज बंद झाल्यामुळे आता देशांतर्गत एअर कार्गो सेवाही फक्त एअर इंडियाच्या विमानांच्या भरवशावर सुरू आहे.
जानेवारी २०१६ मध्ये शहरात पहिले अवयवदान झाले. त्यावेळी दाता असतानाही केवळ एअर अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध नसल्यामुळे दात्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही. त्यानंतर मुंबईच्या एका कंपनीने एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. विमानतळावरून एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नलही मिळाल्या. तीन वर्षांत अनेकांचे अवयवदान झाले; परंतु अद्यापही शहरात एअर अॅम्ब्युलन्स सेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
अजिंठा- वेरूळ हेलिकॉप्टर सेवा
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना जोडून पर्यटन सर्किटमधील पर्यटकांना व विदेशी पर्यटकांना अजिंठा, वेरूळ, शिर्डी, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले व ऐतिहासिक स्थळांकडे आकर्षित करण्यावर भर देण्यात आला. त्यात औरंगाबाद-अजिंठा- वेरूळ हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार होती. परंतु ही सेवाही कागदावरच आहे.
एकत्रित प्रयत्नांची गरज
चिकलठाणा विमानतळाच्या क्षमतेच्या तुलनेपेक्षा कमी विमानसेवा सुरूआहे. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा प्रलंबित आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी हवाई सेवा मागे पडत आहे. त्यासाठी औद्योगिक, पर्यटन संघटना, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे.
- आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए
व्यवसायावर परिणाम
शिर्डी विमानतळामुळे औरंगाबादला येण्याऐवजी थेट शिर्डीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे औरंगाबादला विमानाने येणाºया प्रवासी संख्येत आधीच घट झाली आहे. त्यात आता जेट एअरवेजचे विमान बंद झाले. याचा सगळा पर्यटन, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
- विनोद पाटील, सचिव, औरंगाबाद टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल्स असोसिएशन
प्राधिकरणाकडून प्रयत्न
विमानतळ प्राधिकरणाकडून विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न, पाठपुरावा सुरू आहे. परंतु कंपन्यांकडे विमाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन सेवा सुरू होत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कार्गो सेवाही सुरू होणे लांबणीवर पडत आहे.
-डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ
----------