Video:'नतमस्तक होऊन माफी मागतो'; विनायक राऊतांची ब्राम्हण समाजाकडे 'त्या' विधानावरून माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 07:02 PM2022-03-25T19:02:46+5:302022-03-25T19:04:45+5:30
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.
औरंगाबाद: शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे, या शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांच्या विधानावरून वादंग उठले होते. ब्राम्हण समन्वय समितीने या विधानावर नाराजी व्यक्त करत थेट मातोश्रीवर आंदोलनाचा इशारा दिला होता. आज विनायक राऊत यांनी या विधानावर जाहीर मागितली आहे. ' नतमस्तक होऊन माफी मागतो' अशा शब्दात त्यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागितली.
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. शिवसंपर्क अभियानासाठी शहरात आलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या विधानाचा समाचार घेताना, मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल, असे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे,असा हल्लाबोल केला होता.
मात्र, 'शेंडी आणि जाणवे' या विधानावर ब्राम्हण समन्वय समितीने आक्षेप घेऊन पत्रकार परिषदे घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. राऊत यांनी आठ दिवसात माफी मागावी नसता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्यात येईल असे म्हटले होते. वाढती टीका लक्षात घेता आज खा. राऊत यांनी यावर माफी मागितली. 'नतमस्तक होऊन माफी मागतो' या शब्दात खा. राऊत यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
काय म्हणाले होते खा. विनायक राऊत
जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. मात्र फडणवीसांनी त्यांना जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही, मात्र फडणवीसांसह भाजपाने मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल.