वर्मानगरातून चोरीला गेलेली दागिन्यांची पेटी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:02 AM2021-02-27T04:02:06+5:302021-02-27T04:02:06+5:30

औरंगाबाद: हर्सूल परिसरातील महिलेच्या घरातून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेची लोखंडी पेटी घटनेच्या दुसऱ्या दिवशी जवळच्या शेतात ...

A box of jewelery stolen from Varmanagar was found | वर्मानगरातून चोरीला गेलेली दागिन्यांची पेटी सापडली

वर्मानगरातून चोरीला गेलेली दागिन्यांची पेटी सापडली

googlenewsNext

औरंगाबाद: हर्सूल परिसरातील महिलेच्या घरातून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेची लोखंडी पेटी घटनेच्या दुसऱ्या दिवशी जवळच्या शेतात सापडली. ही चोरी गल्लीतील तरुणाने केल्याच्या संशयावरून तक्रार केली. हर्सूल पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रवीण गंगाराम शिंदे असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला आणि आरोपी दूरचे नातेवाईक असून ते वर्मानगर येथे एकाच गल्लीत राहतात. २४ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते १ वाजेदरम्यान महिलेच्या घराच्या मागील दरवाजाची कडी उघडून सुमारे २ तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू , रोख रक्कम आणि घराच्या मालकीहक्काचे कागदपत्रे असलेली लोखंडी पेटी चोरी झाली. ही पेटी चोरून नेत असताना प्रवीण शिंदे याला पाहिल्याचा आरोप करीत महिला त्याच्या घरी गेली. यावेळी त्यांच्यात भांडण झाले. माझ्यावर खोटा आरोप घेऊ नको, असे शिंदेने तिला सांगितले. याविषयी महिलेने त्याच्याविरुद्ध हर्सुल ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेने सांगितलेल्या पेटीचा शोध घेतला असता त्यांच्या घरापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावरील शेतामध्ये लोखंडी पेटी आढळून आली. या पेटीमध्ये तक्रारीत नमूद केलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि घराच्या मालकीची कागदपत्रे जशीच्या तशी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयित आरोपीची कसून चौकशी केली असता घटनेच्या वेळी तो पडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. याबाबत त्याच्याकडे साक्षीदार असल्याचे पोलिसांना सांगितले. महिलेने त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप केला असे त्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याच्या जबाबाची उलट तपासणी सुरू केली आहे. घटनेच्या वेळी तो खरेच वर्मानगर येथे नव्हता का, याबाबत शहानिशा केली जात आहे. मोबाईल कॉल डिटेलच्या आधारे ही बाब लवकरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A box of jewelery stolen from Varmanagar was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.