ओसंडून वाहणाऱ्या हर्सूल तलावात मुलगा बुडाला; तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:54 PM2024-09-28T12:54:58+5:302024-09-28T12:55:23+5:30
शेकडो तरुणांची गर्दी ओसंडून वाहणाऱ्या हर्सूल तलावावर होत असून सुरक्षारक्षक अपुरे पडत आहेत
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलाव दोन दिवसांपासून ओसंडून वाहत आहे. तलावाच्या सांडव्यावर पोहण्यासाठी दिवसभर शेकडो तरुण गर्दी करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी एक अल्पवयीन मुलगा सांडव्याजवळ बुडत होता. उपस्थित तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. त्याला वाचवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हर्सूल तलावाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी होत आहे. काही तरुण या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती. शुक्रवारी सायंकाळी पोहता येत नसलेल्या तरुणाने पाण्यात उडी मारली. काही वेळेत तो बुडू लागला. आसपासच्या तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले. तलावाच्या सांडव्यावर त्याला उलटे झोपवून पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर, त्याला उचलून पात्राजवळ नेले. तेथेही पोटातील पाणी काढले. हा तरुण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
पोहायला बंदी घालण्याची मागणी
या ठिकाणी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने सुरक्षारक्षक वाढविले नाहीत. तलावावर पोहण्यासाठी बंदी घालायला हवी. निष्पाप एक-दोन तरुणांचा जीव गेल्यावर प्रशासन सुरक्षा वाढविणार का? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी केला आहे.
खासगी रुग्णालयात वेळीच उपचार
हर्सूल तलावात बुडत असलेला मुलगा मिसारवाडी येथील आदिनाथ जाधव असल्याचे रात्री उशिरा समोर आले. त्याला जटवाडा रोडवरील डॉ. आबेद हाशमी यांच्याकडे नेण्यात आले. रुग्णालयात नेले तेव्हा त्याची ऑक्सिजन लेव्हल खूप कमी होती. त्याला ऑक्सिजन लावून औषधोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी ॲम्बु बॅगद्वारे ऑक्सिजन देत घाटीत नेण्यात आल्याची माहिती डॉ. हाशमी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.