चीनवरील बहिष्कार : औरंगाबादेतील उद्योगांना कच्च्या मालासाठी आहे अन्य देशांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:14 PM2020-06-20T19:14:59+5:302020-06-20T19:17:23+5:30
औरंगाबादेतील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही
औरंगाबाद : औरंगाबादेतील केवळ ७० ते ८० कंपन्या चीनमधून कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात करतात. मात्र, चीनमधील लॉकडाऊनच्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. त्या काळात औरंगाबादेतील उद्योगांनी अन्य देशांकडून कच्चा माल आयात केला. त्यामुळे चीनवरील बहिष्कारामुळे येथील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अन्य देशांच्या तुलनेत चीनमधून येणारा कच्चा माल किंवा वस्तू नक्कीच स्वस्त आहेत. मात्र, त्यांचे आयुष्यमानही तेवढेच कमी आहे. चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर औरंगाबादेतील उद्योग व बाजारपेठेवर काही दिवस थोडाफार परिणाम जाणवेल. तसेही औरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेतील पाचही औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांमध्ये जगभरातील विविध देशांतून वर्षाकाठी साधारणपणे दोन हजार कोटींचा कच्चा माल, मशिनरी किंवा संबंधित अन्य वस्तूंची आयात होते. यापैकी चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते. चीनमधून प्रामुख्याने प्लास्टिक, अॅल्युमिनियम, मेडिसिनचा कच्चा माल जास्त प्रमाणात येतो. काही स्पेअर पार्ट येतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये १२ जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७६ दिवसांचा लॉकडाऊन होता. त्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. तेव्हा औरंगाबादेतील उद्योगांनी वेगवेगळे पर्यायी मार्गही शोधले. अन्य देशांतून कच्चा माल आयात केला. स्वदेशी कच्चा मालही घेतला. मात्र, त्याची किंमत थोडी महाग पडली. त्यामुळे चीनमधील लॉकडाऊनमुळे येथील उद्योगांना देश आणि अन्य देशांतील कच्च्या मालाचे स्रोत समजले आहेत.
काही काळ टंचाई जाणवेल
यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर आपल्या देशांत काही काळ थोडी टंचाई जाणवेल. जगातील अन्य देशांतून कच्चा माल आयात करून त्या वस्तू भारतात तयार होतील. सुरुवातीला त्याची किंमतही थोडी जास्त वाटेल; पण यातूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची संधी आहे. भारतीय ग्राहकांनी हे समजून घेतले पाहिजे.
आॅटोमोबाईल उद्योगाकडूनही निर्यातीवर भर
‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, औरंगाबादेतील बजाजसारखे आॅटोमोबाईल उद्योग आणि लहान-मोठ्या आॅटोमोबाईल वस्तू (स्पेअर पार्ट) बनविणाऱ्या उद्योगांची आयात कमी आणि निर्यातीवरच जास्त भर आहे. त्यामुळे चीनवरील बहिष्काराचा आॅटोमोबाईल उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही.