'औरंगाबादची पोर,जरा जपून चला,पुढे धोका आहे'; शहरावरील रॅपचा धुमाकूळ, तुम्ही ऐकलंत का ?
By सुमेध उघडे | Published: January 16, 2022 11:05 AM2022-01-16T11:05:41+5:302022-01-16T11:07:05+5:30
'आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहोत, आता आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, सावधान, आम्ही औरंगाबादची पोर, पुढे धोका आहे.'
- सुमेध उघडे
औरंगाबाद : पर्यटन राजधानी, ऐतिहासिक ठेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, औद्योगिक प्रगती, सामाजिक जाणीव असणाऱ्या शहराचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे. मात्र, इथल्या मुलामुलींना अनेक क्षेत्रात केवळ मराठवाड्यातला, औरंगाबादचा आहे म्हणून डावलले जाते, कमी लेखले जात असल्याचे चित्र दिसत आहे. या संकुचित विचाराला युवा रॅपर क्रेझीदिओजी अर्थात यश लुंगारे याने 'पुढे धोका आहे, औरंगाबादची पोर' या रॅपमधून सणसणीत चपराक लावली आहे. हे रॅप सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत असून यु ट्यूबवर याला अल्पवधीत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.
संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश येथून शहरात शिक्षण, व्यवसाय, नोकरीच्या निर्मित्ताने येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु, येथील तरुण मेट्रोसिटींमध्ये नोकरी, कला, व्यवसायासाठी गेले असता त्यांना कमी लेखले जाते. याच विचारसरणीचा रॅपर यशने आपल्या तिखट शब्दात समाचार घेतला आहे. 'आमच्या पोरी बी किलर, पुढे धोका आहे', 'आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहोत, आता आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, सावधान, आम्ही औरंगाबादची पोर, पुढे धोका आहे.', असा इशारा ही रॅपमधून यशने दिला आहे. ऐतिहासिक महत्व, जुने औरंगाबाद, शहरातील बलस्थाने, खानपान, सांस्कृतिक ठेवा, महिला सुरक्षा याची ओळख या रॅपमधून करून देण्यात अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेला यश यशस्वी ठरला आहे. त्याने विश्वनाथ दाशरथे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. तर रॅप पूर्णत्वात येण्यासाठी आई योगिता श्रोत्रिया हिने प्रेरणा दिली.
मित्रांनी सांभाळली सर्व जबाबदारी
रॅपमधून मी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो, लॉकडाऊनमध्ये संगीताचा अभ्यास, नवीन तंत्रज्ञान शिकले. एकेदिवशी प्रशांत सोनवणे या मित्राने मेट्रो सिटींवरील रॅप दाखवले. त्यात इतर शहरातील तरुणांना कमी लेखले होते. याला उत्तर देण्यासाठी औरंगाबादवर रॅप लिहिले आणि स्वतःच संगीतबद्ध केले, अशी रॅपच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी यश सांगतो. विशेष म्हणजे, शुटींग, एडिटिंग ही अत्यंत खर्चिक निर्मिती प्रक्रिया श्रेया मसे, पायल कुर्वे, यश खरात, सई भीष्मा, रोहित डुकरे, उत्कर्ष सोनी, अमित साखरे, अनुज भंडारे, विशाल मुसळे, ऋषिकेश धोपटे, स्वानंद मामेलवार, चीमय देशमुख पृथ्वी तिळवणकर, दर्शन वटारे या मित्रांनीच सांभाळ्याने सर्व स्वस्तात आणि दर्जेदार झाले आहे.