मुलं म्हणाले, घर आमच्या नावावर करा व तुम्ही दोघे वृद्धाश्रमात जा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:16 PM2018-12-01T23:16:16+5:302018-12-01T23:17:32+5:30
औरंगाबाद : संपत्ती पुढे सर्वच नाती मातीमोल ठरत आहेत. देवाच्या रुपात ज्यांना पाहिले जाते, असे तीर्थरूप आई-वडील घर आपल्या ...
औरंगाबाद : संपत्ती पुढे सर्वच नाती मातीमोल ठरत आहेत. देवाच्या रुपात ज्यांना पाहिले जाते, असे तीर्थरूप आई-वडील घर आपल्या नावावर करीत नाहीत म्हणून त्यांचा छळ पोटची दोन मुले व सुनांकडून सुरू होता. त्यामुळे हतबल झालेल्या वृद्ध आई-वडिलांना पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवावी लागल्याची लाजिरवाणी घटना सिडकोत २९ नोव्हेंबर रोजी घडली.
वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे मुलांना कायद्याने बंधनकारक केले आहे; परंतु ही जबाबदारी तर सोडाच घर नावे करून द्यावे, पेन्शनचे पैसेही द्यावेत यासाठी मुले आणि सुनांनी वृद्ध आई-बाबांना त्रास देऊन घराबाहेर हाकलून दिले होते. मुले विनोद अमृतराव फतपुरे, धीरज अमृतराव फतपुरे आणि दोन सुनांचा आरोपींत समावेश आहे. सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-७ मधील गेडोर कॉलनीमध्ये अमृतराव धनसिंग फतपुरे (६५) हे पत्नी आणि दोन मुले, सुना यांच्यासह राहतात. त्यांना विनोद आणि धीरज ही दोन विवाहित मुले आहेत. त्यांची मुले आणि सुना त्यांना त्यांच्या नावे घर करण्यासाठी दबाव टाकीत आहे. घरखर्चासाठी वृद्ध आई-वडिलांकडून त्यांच्या पेन्शनची रक्कमही ते घेतात. पैसे दिले नाही तर अपमानास्पद बोलतात. मुलांच्या नावे घर केल्यानंतर आपला मुक्काम वृद्धाश्रमात हलविण्याचे मुलांचे इरादे पाहून वडील अमृतरावांनी मुलांच्या नावे घर करणे टाळलेच.
वडील घर नावावर करीत नाहीत हे पाहून मग, धीरजने दुसरी युक्ती लढवून घर बांधण्यासाठी सासुरवाडीकडून आणलेले तीन लाख रुपये परत देण्यासाठी घरात भांडण-तंटे सुरू केले. काहीही करून आई-वडिलांनी वृद्धाश्रमात राहण्यासाठी जावे, यासाठी धीरज त्यांना शिवीगाळ करून त्रास देतो. वडील बधत नाहीत, हे पाहिल्यावर दोन्ही मुलांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलून देत बेघर केले.
चौकट
आई-वडिलांचा सांभाळ करणे बंधनकारक
कायद्यानुसार वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे मुलांना बंधनकारक आहे. परंतु मुलांनीच बेघर केल्याने अमृतराव यांनी विनोद आणि धीरज तसेच त्यांच्या पत्नींविरोधात सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून सहायक उपनिरीक्षक पठाण तपास करीत आहेत्