बीपीएलधारकांना साखर ‘कडू’...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 12:15 AM2017-06-19T00:15:34+5:302017-06-19T00:16:22+5:30
जालना : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन दुकानात अंत्योदय व बीपीएल धारकांना मिळणाऱ्या साखरेच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन दुकानात अंत्योदय व बीपीएल धारकांना मिळणाऱ्या साखरेच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पंधरा रुपये प्रतीकिलो दराने मिळणारी साखर आता वीस रुपये प्रतीकिलोने मिळणार आहे. राज्यात जूनपासून लागू करण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार २१७ लाभार्थ्यांना स्वत धान्य दुकानात सारख खरेदीचा कडू अनुभव येत आहे.
अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली रेशन अन्नधान्याचे वितरण केले जाते. स्थानिक स्तरावर जिल्हा पुरवठा विभागामार्फत रास्त भाव दुकानदार हे काम करतात. जिल्ह्यात एक हजार २७८ रेशन दुकानातून शासनाकडून अनुदानावर मिळणारे गहू, तांदूळ, सण-उत्सावात मिळणारे तेल, साखर याचे वितरण केले जाते. विशेष प्रसंगी गरिबांना अल्प किमतीत साखर उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने २०१४ पासून खुल्या बाजारातून साखर खरेदी करून प्रतीव्यक्ती पाचशे ग्रॅमप्रमाणे साखरचे वाटप सुरू केले. यासाठी केंद्र शासनाकडून साखरेवर प्रतीकिलो १८ रुपये ५० पैसे अनुदान दिले जाते. मात्र, रेशन साखर वितरण प्रणालित केंद्रशासनाने आता बदल केला आहे. त्यानुसार २४ मे २०१७ च्या निर्णयानुसार फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती कुटुंब एक किलो साखर वितरित करण्यात येणार आहे. राज्यशासनाने अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांना प्रती कुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय घेतला असून, साखर विक्रीचे दर पंधरा ऐवजी वीस रुपये प्रतीकिलो राहणार आहेत.