ब्रह्मवादिन्यै शुभं भवतु सावधान...सख्ख्या बहिणींची मौंज पाहण्यासाठी नातेवाइकांची गर्दी
By प्रशांत तेलवाडकर | Published: February 13, 2024 11:40 AM2024-02-13T11:40:41+5:302024-02-13T11:42:32+5:30
मुलींचीही मौंज केली जाते, हे आम्हाला या निमित्ताने कळाले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.
छत्रपती संभाजीनगर : दोन सख्ख्या बहिणी एका बाजूला उभ्या होत्या.. त्यांचे वडील समोरील बाजूस पाटावर बसून होते. त्यांच्यामध्ये अंतरपाट धरण्यात आला होता. मंगलाष्टकाला सुरुवात झाली...‘ब्रह्मवादिन्यै शुभं भवतु सावधान’ असे गुरुजी म्हणताच, उपस्थितांनी ब्रह्मवादिनींवर अक्षता टाकून टाळ्या वाजविल्या... नंतर वडिलांनी दोन्ही मुलींना आपल्या मांडीवर बसविले व आईने मुलींच्या गळ्यात हार घातला... या ऐतिहासिक क्षणाचे निमंत्रित साक्षीदार झालेले सारे जण या मुलींच्या मौंजीत केल्या जाणारा सर्व विधी संस्कार डोळे भरून पाहत होते.
बीड बायपास येथील उद्योजक अजिंक्य दलाल यांच्या मुली आद्या (वय ८ वर्षे) व आरोही (५) यांच्यावर रविवारी अभिजीत मुहूर्तावर उपनयन संस्कार करण्यात आले. मुलींची मौंज कशी लागते, या उत्सुकतेपोटी व त्या दोघींना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. मौंज लागण्याआधी वेदमूर्ती मृदूल जोशी गुरुजी यांनी उपस्थित निमंत्रितांना मुलांच्या व मुलींच्या उपनयन संस्कारात काय फरक असतो, मुळात मुलींवर उपनयन संस्कार का करावे, याची शास्त्राधारे ओघवत्या शैलीत माहिती सांगितली. मुलींचीही मौंज केली जाते, हे आम्हाला या निमित्ताने कळाले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.
आईने भरविला ब्रह्यवादिनींना घास
सख्ख्या बहिणींनी सकाळी प्रायश्चित्त हवन केले, त्यानंतर चौल कर्मात मुंडण न करता प्रतीकात्मक स्वरूपात डोक्यावरील चार केस काढण्यात आले... स्नान झाल्यानंतर ब्रह्मवादिनींना त्यांच्या आईने आपल्या हाताने घास भरविला (मातृभोजन) आणि त्यानंतर ब्रह्मवादिनी देव-दर्शनाला जाऊन आल्या. मंगलाष्टक झाले. याज्ञिकाच्या वेळी दोघींनी जानवे धारण केले. त्यांनी गायत्री उपदेश घेऊन अग्निसेवा केली. भिक्षेसाठी दोघी तयार झाल्या. उपस्थित महिलांनी त्या दोघींच्या झोळीत भिक्षा वाढली (भिक्षावळी) आणि या उपनयन संस्काराची सांगता झाली.