स्वराभिषेकाने भारावले शहरातील ब्रह्मवृंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:12 AM2017-11-06T00:12:28+5:302017-11-06T00:13:35+5:30
पं. शौनक अभिषेकींच्या कंठातून उमलणारे सारे काही जसेशच्या तसे मनात साठवून ठेवण्यासाठी ब्रह्मवृंद मोठ्या उत्कंठतेने सारे काही टिपून घेत होते. २५ ब्राह्मण संघटनांचा सहभाग असलेल्या ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी दीपावली स्नेहमिलनानिमित्त आयोजित ‘स्वराभिषेक’ ही मैफल रसिकांना सुरांची सुरेख अनुभूती देऊन गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चंद्र- चांदण्यांच्या शीतल प्रकाशात गुलाबी थंडीच्या साक्षीने खानदानी सुरांचा अविरतपणे होणारा वर्षाव वातावरणाला अधिकच आल्हाददायक करून जात होता. पं. शौनक अभिषेकींच्या कंठातून उमलणारे सारे काही जसेशच्या तसे मनात साठवून ठेवण्यासाठी ब्रह्मवृंद मोठ्या उत्कंठतेने सारे काही टिपून घेत होते. २५ ब्राह्मण संघटनांचा सहभाग असलेल्या ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी दीपावली स्नेहमिलनानिमित्त आयोजित ‘स्वराभिषेक’ ही मैफल रसिकांना सुरांची सुरेख अनुभूती देऊन गेली.
हजारो ब्रह्मवृंदांच्या साक्षीने सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर हा सूर सोहळा पार पडला. समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, श्रीरंग देशपांडे, कार्यक्रमाचे प्रकल्पप्रमुख मंगेश पळसकर, सुरेश देशपांडे, मिलिंद दामोदरे, आनंद तांदुळवाडीकर, धनंजय पांडे, अनिल खंडाळकर, संजय मांडे, आशिष सुरडकर, परिमल मराठे, सचिन अवस्थी, महिला आघाडीच्या विजया कुलकर्णी आणि समितीच्या इतर पदाधिका-यांच्या हस्ते शांतीपाठाच्या गजरात दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
पं. अभिषेकी यांचे रंगमंचावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले. हरिनामाचा गजर करून अभिषेकी यांनी गायनाला सुरुवात केली आणि सुरांची एकच आतषबाजी सुरू झाली. ‘शांताकारम भुजगशयनम’ हा श्लोक त्यांच्या कंठातून ऐकणे रसिकांसाठी नवा अनुभव देणारे ठरले. यानंतर त्यांनी सादर केलेल्या ‘जय जय रामकृष्ण हरी...’ या गजराने अवघ्या रसिकांनाच भक्तीमय ठेका धरण्यास भाग पाडले.
अभिषेकी यांच्या गळ्यातून उतरणारा प्रत्येक सूर त्यांना लाभलेल्या खानदानी संस्कारांची आठवण करून देणारा ठरला. जयपूर व आग्रा घराण्याच्या शैलींचे अभूतपूर्व मिश्रण करून पं. शौनक यांनी गायलेले पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ‘सुहास्य तुझे मनास मोही...’ हे पद अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेले.
दमदार आणि तेवढ्याच घायाळ आवाजात ‘सावरीयासे नयना हो गए चार, लागी कलेजवा क ट्यार....’ या नाट्यगीताचे स्वर अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेले. या गीताने क्षणभर भावुक झालेले वातावरण ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची मोजणी..’ या गीताच्या सादरीकरणाने भक्तिरसात बुडून गेले. ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकातील शांता शेळके यांच्या लेखणीतून उतरलेले ‘काटा रुते कुणाला..’ तसेच ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ ही नाट्यगीते रसिकांची मनोमन दाद मिळविणारी ठरली. पांडुरंग उघडे, उदय कुलकर्णी, सत्यजित बेडेकर, राज शहा यांनी पं. शौनक
यांना साथसंगत केली. दुधाळ चंद्रप्रकाशात सुरांची होणारी ही मुक्त उधळण ब्रह्मवृृंदांसाठी संस्मरणीय ठरली.
गोव्याच्या मातीतच संगीत
कार्यक्रमादरम्यान महेश अचिंतलवार यांनी प्रश्न विचारून पं. शौनक अभिषेकी यांना बोलते केले. आपल्याला लाभलेल्या सांगीतिक वारसाविषयी सांगताना ते म्हणाले की, आम्ही मूळचे गोव्याचे. तेथे मंगेशाई मंदिरात पौरोहित्य करणारे आमचे पूर्वज. मंगेशावर आमच्याकडून सातत्याने होणाºया अभिषेकामुळेच आम्ही नंतर ‘अभिषेकी’ म्हणून ओळखले जाऊ लागलो. आजोबा कीर्तनकार भिकाजी अभिषेकी यांच्याकडून आपण शास्त्रीय संगीत शिकलो तर चुलत आजोबा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून नाट्यसंगीताचा वारसा मिळाला. त्यानंतर वडील पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संस्कार होत गेले. मी मूळचा गोव्याचा असून, गोव्याच्या मातीतच संगीत आहे, असे त्यांनी नमूद
केले.
राजेंद्र दर्डा यांच्याकडून शुभेच्छा
लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजन समितीचे तसेच ब्राह्मण समाज समन्वय समितीचे पुष्पगुच्छ देऊन मनापासून कौतुक केले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर प्रकल्पप्रमुख मंगेश पळसकर यांनीही राजेंद्र दर्डा यांचा सत्कार केला.
...तर गाणे आले नसते
वडिलांकडे गुरू म्हणून पाहताना आलेले अनुभवही पं. शौनक यांनी सांगितले. ते म्हणाले की, गुरू-शिष्य परंपरेनुसार पं. जितेंद्र अभिषेकी शिष्यांना घडवायचे. त्यासाठी त्यांनी कधीही शिष्यांकडून एकही पैसा घेतला नाही. ज्याक्षणी मी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले, त्याचक्षणी पुत्राची भूमिका मागे पडली. शेवटपर्यंत आमचे नाते गुरू- शिष्य असेच राहिले. त्यामुळे त्यांचा मार व शिव्यांचा पहिला अधिकारीही मीच झालो. जर त्याकाळी माया आड आली असती तर आज गाणे आले नसते, अशा प्रांजळ भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.