ब्राह्मण समाज करणार ताम्हण-पळी बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:02 AM2021-01-18T04:02:16+5:302021-01-18T04:02:16+5:30
औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत ...
औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाला जागे करण्यासाठी ब्राह्मण समाज संघर्ष समिती दिनांक २२ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तालयासमोर ताम्हण-पळी बजाव आंदोलन करणार आहे.
यामध्ये शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समितीचे समन्वयक दीपक रणनवरे, विजया कुलकर्णी, संतोष व्यवहारे, प्रमोद भालेराव, विजया अवस्थी आदी उपस्थित होते.
तत्कालिन सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ब्राह्मण समाजाची अवस्था फार विचित्र झाली असून, कोणत्याही राजकीय पक्षाचे आमच्याकडे लक्ष नाही. इतर पक्ष आम्हाला आम्ही भाजपचे मतदार आहोत, असे समजून दुर्लक्ष करत आहेत, तर भाजपही आम्हाला गृहित धरतो आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांना आम्ही मागण्यांसंदर्भात निवेदने दिली असून, वारंवार पाठपुरावाही केला. मात्र, याचा काहीच परिणाम होत नसल्याने राज्यव्यापी आंदोलन करत असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. यानंतरही शासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशाराही समितीने दिला.
चौकट :
ब्राह्मण समाजाच्या मागण्या-
समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळासाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद करावी, प्रत्येक जिल्ह्यात मुला- मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करावे, केजी टू पीजी शिक्षण मोफत करावे, ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अथवा तत्सम कायदा करून कारवाई करावी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, पुुरोहित समाजाला मासिक ५ हजार रूपये मानधन सुरू करावे, ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात.