ब्रह्मोत्सवात भगवंतांचा विवाहोत्सव थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:04 AM2017-11-05T01:04:13+5:302017-11-05T01:04:21+5:30
येथील पुरातन बालाजी मंदिरात सुरु असलल्या ब्रह्मोत्सवात काढण्यात येणा-या उत्सव शोभायात्रेत भाविकांची गर्दी वाढत असून सहा दिवस चालणारा हा उत्सव शहरवासियांसाठी भक्तीची पर्वणी असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील पुरातन बालाजी मंदिरात सुरु असलल्या ब्रह्मोत्सवात काढण्यात येणा-या उत्सव शोभायात्रेत भाविकांची गर्दी वाढत असून सहा दिवस चालणारा हा उत्सव शहरवासियांसाठी भक्तीची पर्वणी असतो. तिरुपती तिरुमला बालाजीप्रमाणेच येथे होणारा ब्रह्मोत्सव शहराचा वैभव वाढविणारा आहे. दाक्षिणात्य छाप असलीतरी महाराष्टÑाच्या संस्कृतीशी नाळ जुळवित होत असलेला हा उत्सव पेठबीड भागासाठी जणू दुसरी दिवाळीच असते.
ब्रह्मोत्सवाचे हे तेरावे वर्ष असून यशस्वी आयोजनामध्ये विविध समित्यांचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. बुधवारी पुण्याह वाचन, अंकुर अर्पणम् विधीने देवदेवतांना आवाहन करुन गुरुवारी हवनपूजा आणि ध्वजारोहणम् सोहळ्याने ब्रह्मोत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी कलश स्थापनेनंतर शेष वाहन शोभायात्रा काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी हंस वाहन आणि रात्री गरुड वाहन शोभायात्रा काढण्यात आली. शनिवारी सकाळी हनुमंत वाहन शोभायात्रा काढण्यात आली. ब्रह्मोत्सवातील महत्वाचा कल्याण उत्सव सोहळा सायंकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
दरम्यान, रविवारी रथोत्सव शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाचे हिरालाल सारडा, अॅड. ओमप्रकाश जाजू, अॅड. डॉ. सत्यनारायण कलंत्री, अमृत सारडा, राजेंद्र बनसोडे, द्वारकादास मुंदडा, लक्ष्मण शेनकुडे, मिलिंद महाजन, सुशील खटोड, नरेंद्र सारडा आदींनी केले आहे.