‘दानवे हटाव’वर आज मंथन
By Admin | Published: September 12, 2016 11:16 PM2016-09-12T23:16:06+5:302016-09-12T23:23:52+5:30
ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.
औरंगाबाद : शिवसेनेचे पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बैठकीला जाण्यासाठी सेनेतील दोन्ही गट सोमवारी मुंबईला रवाना झाले.
आ. शिरसाट यांच्यासह जैस्वाल, माने, त्रिवेदी यांनी दानवे यांच्यावर पक्ष विक्रीचा आरोप केल्यानंतर पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असून, त्यांच्या आदेशाने खा.देसाई हे बैठक घेऊन या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाकरे परदेशातून येईपर्यंत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाकरे आल्यानंतर पुन्हा याप्रकरणी बैठक होणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
पालकमंत्री रामदास कदम, खा.चंद्रकांत खैरे, खा.देसाई, आ.शिरसाट, दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी आ.जैस्वाल, माने, त्रिवेदी यांची बैठकीला उपस्थिती असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाद शांत करावा लागेल. हे प्रकरण पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. ठाकरे दौऱ्यावरून परत येईपर्यंत सर्वांना थोपवावे लागेल. त्यांनी खा.देसाई यांना मध्यस्थी करण्यास सांगितले आहे. घोसाळकर आणि खा.खैरे यांची भूमिका बॅलन्स आहे. सकारात्मक चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. पक्षात कुणीही ‘अमरपट्टा’ बांधून आलेले नाही. त्यामुळे बैठकीत योग्य तोच निर्णय होईल. नेतृत्वाने नि:पक्षपाती काम केले पाहिजे. ते होत नसल्यामुळे भविष्यात कधी तरी होणारा गदारोळ आताच झाला आहे. यामध्ये दोष कुणालाही द्यायचा नाही. पक्षाच्या मुळावर जर कुणी घाव घालत असेल तर पक्ष गप्प बसणार नाही.