ब्रम्हगव्हाण योजना १ हजार कोटींवर; शेती पिकेना, पाणी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:13+5:302021-03-04T04:06:13+5:30
२५ हजार हेक्टर सिंचनाचा दावा: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधीअभावी घरघर विकास राऊत औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन ...
२५ हजार हेक्टर सिंचनाचा दावा: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधीअभावी घरघर
विकास राऊत
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम मागील ११ वर्षांपासून सुरू आहे. ११ वर्षांत २२५ वरून १ हजार कोटी रुपयांवर ही योजना पोहोचली असून काम रखडल्यामुळे शेती आणि सिंचनाला घरघर लागली आहे. कंत्राटदारांनी संथगतीने काम केल्यामुळे योजनेची किंमत वाढत गेली आहे. योजनेचा टप्पा क्र.२ च्या सुधारित अंदाजपत्रकाला जलसंपदा विभागाकडून मान्यताच मिळालेली नाही, तर तिसऱ्या टप्प्यातील योजनेला अजून मुहूर्तच लागलेला नाही. या दोन्ही योजनांसोबतच फुलंब्रीतील वाकोद, सिल्लोडमधील शिवना-टाकळी, कन्नड तालुक्यातील रंगारी देवगांव या योजना देखील रेंगाळल्या आहेत.
ब्रम्हगव्हाण योजना टप्पा क्र.१ आणि २ मिळून १५ हजार आणि उर्वरित योजनांमधून १० हजार अशी सुमारे २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याचा दावा करणाऱ्या या योजना केव्हा होणार असा प्रश्न आहे. २५० हून शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी, भूसंपादन प्रक्रिया होऊनही ब्रम्हगव्हाण योजनेच्या कामाची गती वाढली नाही. योजनेचे काम पूर्णत्वाला जाण्याऐवजी विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या योजनेचे काम अंबरवाडीकर अॅण्ड कंपनीने साहस इंजिनिअर्सकडे दिले असले तरी सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे काम कधी सुरू होणार असा प्रश्न आहे.
योजनेचे काम रखडल्यामुळे भूसंपादनाची किंमतही वाढली. ५ कोटींऐवजी २५० कोटींपर्यंत भूसंपादनाची रक्कम गेली आहे. अंबरवाडीकर अॅण्ड कंपनीकडे ५५ कोटींचे काम होते. १० वर्षांत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने कामास उशीर झाल्याने कंत्राटदारांची चौकशी केली, मात्र पुढे काही झाले नाही. सध्या सुधारित अंदाजपत्रक नाशिक जलसंपदा विभागाच्या कात्रीत अडकले आहे.
शिवना-टाकळीचा प्रकल्प अधांतरी
हा प्रकल्प २०० ते २५० कोटींच्या आसपास आहे. त्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु पुढील काम मार्गी लागलेले नाही. कालव्याचे काम रखडलेले आहे.
वाकोदचे नवीन काम प्रस्तावित
नदीपात्रातून जोडणी देणे प्रस्तावित असून त्याचे अंदाजपत्रक केलेले नाही. हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. स्थानिक पातळीवरच त्या प्रकल्पाचे काम रखडलेले आहे.
कानडगाव पुनर्वसन प्रकल्प रखडला
देवगांव-रंगारी येथील कानडगाव पुनर्वसन प्रकल्प आहे, त्याला १०० कोटींच्या आसपास खर्च लागणार आहे. कानडगाव पूर्ण नव्याने वसविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सिंचन योजना आणि खर्च
ब्रम्हगव्हाण टप्पा क्र.२- १ हजार कोटींवर
ब्रम्हगव्हाण टप्पा क्र-३- कायगांव ते लासूर १ हजार कोटी
फुलंब्री वाकोद- अद्याप काही तयारी नाही
शिवना टाकळी- २५० कोटींवर
रंगारी देवगांव - १०० कोटींवर
कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी
डिव्हीजन क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी सांगितले, ब्रम्हगव्हाण योजनेची सुधारित अंदाजपत्रकीय किंमत वाढली आहे. भूसंपादनास देखील रक्कम लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पाणी देण्यास सुरू केले आहे. मुख्य कालव्याचे काम झाले असून वितरण केले जात आहे. जशी रक्कम उपलब्ध होईल, तसे काम गतीने पुढे जाईल.
योजनेचे पूर्णत: वाटोळे होत आहे
ब्रम्हगव्हाण योजनेचे पूर्णंत: वाटोळे होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजनेबाबत अनिश्चितता आहे. पहिल्या टप्प्यातील योजनेचे कामही गुणवत्तापूर्ण झालेले नाही. या प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. पाणी मिळेल, शेती फुलेल या उद्देशाने तयार केलेली योजना सध्या अधांतरीच आहे, असे म्हणावे लागेल.
जयाजी सूर्यवंशी, शेतकरी