सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
By बापू सोळुंके | Published: April 12, 2024 04:59 PM2024-04-12T16:59:07+5:302024-04-12T16:59:26+5:30
तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता.
छत्रपती संभाजीनगरः उद्धव साहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या मोदी आणि शहा यांनी मात्र यापूर्वी शिवसेनेचे अनेकदा उंबरठा झिजवले हे विसरू नये, असे खडेबोल विधान परिषदेची विरोधीपक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सुनावले. सीबीआय ईडी आणि आयकर हे भाजपाचे शाखा कार्यालय झाले असल्याची टीकाही दानवे यांनी केली.
मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा आरोप केला, याकडे लक्ष वेधले असता आमदार दानवे म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात विकासाचे काय दिवे लावले ? त्यांनी महागाई वर बोलावे, हरघर नल योजनेचे काय झाले असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले प्रत्येकाच्या घरावर छत देणार होते त्याचे काय झाले? आयुष्यमान भारत कार्ड योजनेतून पाच लाखापर्यंत उपचार देण्याचा खोटा प्रचार तुम्ही केला. मात्र आज सोयगाव तालुक्यातील एका मुलीला जळगाव येथे आयुष्यमान भारत योजनेतून उपचार नाकारण्यात आले याकडे दानवे यांनी विरोधकांचे लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले. तरी महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ संपलेला नाही. महायुतीमध्ये आता एकोपा राहिला नाही . उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचे म्हणता परंतु याच शिवसेनेची उंबरठे तुम्ही झिजवले होते असे बोल दानवे यांनी सुनावले.
तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता. पण उद्धव ठाकरे तुम्हाला शरण येणार नाही. आमची शिवसेना लढा देणारी आहे. आम्ही लढा जिंकण्याचा संकल्प केला असल्याचे दानवे यांनी सांगितले. कोल्हापूर संस्थांची शाहू महाराज यांच्या विषयी महायुतीचे उमेदवाराने अपशब्द वापरले शाहू महाराज हे एका गादीचे वारसदार आहेत केवळ राजकारणासाठी त्यांचा अवमान जनता सहन करणार नाही असे आमदार दानवे म्हणाले.