लॉकडाऊनमधील आधार खंडित; केंद्राकडून राशन दुकानांवर होणारा मोफत तांदूळ पुरवठा झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:48 PM2020-12-08T15:48:13+5:302020-12-08T15:50:20+5:30
केंद्र शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ पुरवठा केला.
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू केल्यानंतर केंद्र शासनाने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून मोफत पुरवठा करण्यास सुरुवात केली होती. ३० नोव्हेंबरपर्यंत ही योजना होती. ही योजना एक आठवड्यापासून बंद करण्यात आली असून, यापुढे स्वस्त धान्य दुकानांवरून मोफत तांदूळ पुरवठा करायचा की नाही, याबाबतचा निर्णय केंद्र शासनच घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
लॉकडाऊनमध्ये गरिबांना केवळ रेशनचाच आधार होता. त्यात केंद्र शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ पुरवठा केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन केले. त्यामुळे लाखो कुटुंबांचे हाल होऊ नये म्हणून त्यांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविण्याचे निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यातील विविध योजनांतील जवळपास ८० टक्के लाभधारकांना एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत धान्य वाटप करण्यात आले.
सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमान्वये मराठवाड्यातील ७ लाख ३७ हजार केशरी कार्डधारकांनाही (एनपीएच) सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना १ मे पासून धान्य उपलब्ध करून देण्यात आले. यासह मराठवाड्यात विविध योजनांतून तब्बल ४१ लाख ४१ हजार १६७ कार्डधारकांना धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. मराठवाड्यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्नयोजना, तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी, अशा एकूण ३४ लाख ३ हजार २८३ कार्डधारकांना, तर ७ लाख ७३ हजार केशरी कार्डधारकांना धान्य योजनेचा लाभ देण्यात आला.