समन्वय बैठकांना ब्रेक; लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधीना अंशत: विचारलेही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:45 PM2021-03-12T12:45:50+5:302021-03-12T12:46:30+5:30
Partial Lockdown in Aurangabad जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने घेतलेल्या संयुक्त बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींची बैठकही घेतली नाही. किंबहुना त्यांना याबाबत काही सूचनादेखील केल्या नाहीत.
औरंगाबाद : कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतांना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंशत: देखील विचारले नाही. शनिवारी आणि रविवारच्या १०० टक्के लॉकडाऊनवरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड सुरू केली आहे.
दुसरीकडे कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि निर्णयाबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय राहावा, यासाठी जुलै २०२० पासून दर सोमवारी होणाऱ्या बैठकीला ऑक्टोबर २०२० पासून ब्रेक लागला तो आजपर्यंत कायम आहे.
जुलै महिन्यांत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड करून समन्वय नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा, जिल्हाप्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत मध्यस्थी केली. आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनाने दर सोमवारी नियमित बैठक आयोजित केली. कोरोनाचे रुग्ण कमी होताच, बैठकही गुंडाळण्यात आली.
२०२० मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील दर सोमवारी बैठक झाल्यात. त्यात रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणे, टेस्ट वाढविणे, खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव बिलांचे परीक्षण करणे, व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासारखे महत्त्वाचे निर्णय झाले.
लोकप्रतिनिधींचा चक्क विसर
जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने घेतलेल्या संयुक्त बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींची बैठकही घेतली नाही. किंबहुना त्यांना याबाबत काही सूचनादेखील केल्या नाहीत.
संसर्ग संपल्याचा सर्वांचाच अविर्भाव
कोरोनाचा संसर्ग संपल्याच्या अविर्भावात सगळेच वावरत होते. लोकप्रतिनिधींनीदेखील गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. इकडे प्रशासनानेही सोहळ्यांकडे दुर्लक्ष केले. क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था गुंडाळण्यात आली. लसीकरण सुरू झाल्यामुळे सगळे आलबेल होणार असे वाटत असतांनाच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एबीसीडीपासून सगळी सुरुवात प्रशासनाला करावी लागत आहे.
प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला
खा.डॉ.भागवत कराड म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून बैठक घेणे अपेक्षित होते. व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिकांना विश्वासात घेण्याऐवजी प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला आहे. उपचाराची क्षमता, क्वारंटाईन सेंटर्स, खासगी रुग्णालयांतील उपचार याबाबत सगळेच अधांतरी असल्याचे दिसते आहे.
शनिवार, रविवार विषाणू सुटीवर असतो का
खा.इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियातून टीका करतांना म्हटले आहे, शनिवारी आणि रविवारी कोरोनाचा विषाणू सुटीवर असणार आहे काय? विषाणूने प्रशासकीय यंत्रणेला सांगितले आहे का, तो केव्हा येणार आणि संसर्ग वाढविणार. ५०० कामगार उद्योगात जाऊ शकतात, परंतु मास्क घातलेले १०० नागरिक विवाहात सहभागी होऊ शकत नाहीत. हे खेदजनक आहे.
लॉकडाऊनची ही पध्दत नाही
आ.संजय शिरसाट म्हणाले, लॉकडाऊन करण्याची ही पध्दत नाही. परमिट रूम रात्री ९ वाजेपर्यंत चालू ठेवायचे आणि व्यायामशाळा, जिम बंद ठेवायचे. लॉकडाऊनची लोकांची मानसिकता नाही. एकदम निर्णय घेणे योग्य नाही. अधिवेशनातून परतल्यानंतर प्रशासनाला याबाबत विचारणा करण्यात येईल.