भर दुपारी घर फोडून चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:00 PM2018-09-26T13:00:13+5:302018-09-26T13:00:59+5:30
रेल्वेस्टेशन बाबा पंपाच्या रोडवरील शिल्पनगरातील सी.ए.चे घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये पळविले
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन बाबा पंपाच्या रोडवरील शिल्पनगरातील सी.ए.चे घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये पळविल्याची घटना मंगळवारी (दि. २५) दुपारी घडली. वेदांतनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महेश अग्रवाल व त्यांची पत्नी हे दोघे कामानिमित्त नेहमीप्रमाणे गेले असता घरी कुणीच नव्हते. अग्रवाल यांचा दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट असून चोरट्यांनी लोखंडी टॉमीने घराचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. चांदीचे नाणे व चिल्लर पैसे सोडून फक्त सोन्याचे दागिनेच चोरट्यांनी पळविले. दुपारी अग्रवाल कुटुंब घरी आल्यानंतर तुटलेल्या कुलपाला पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात चोरीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक आडे व त्यांचे कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, अजबसिंग जारवाल, देशमुख, दसरे, शिवाजी झिने, राजेंद्र सोळुंके आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सीसीटीव्ही तपासणी
अग्रवाल यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली त्यावेळेत या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांचे फुटेज, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे. तेथील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बाजूला जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू असून, तेथील मजुरांची चाचपणीदेखील पोलिसांनी केली आहे. पॉम्प्लेट टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला देखील बोलवून त्याची चौकशी केली आहे.
भाजीमंडईतून ठेवले असावे लक्ष
सदरील रस्त्यावर भाजीपाला विक्रेते येऊन बसतात. कोण कधी घरी येतो व जातो याची रेकी करूनच त्यापैकी कुणी तरी डल्ला मारला असावा, असा अंदाज या भागातील नागरिकांनी वर्तविला आहे. नगरसेवक, मनपा अधिकारी यांना अनेकदा सांगूनसुद्धा अघोषित भाजीमंडई हटविण्यात आलेली नाही.