ऊस तोडू, पण मुलांना उच्च शिक्षण देऊ
By Admin | Published: June 15, 2016 11:59 PM2016-06-15T23:59:21+5:302016-06-16T00:15:31+5:30
औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पालकांनी केला.
औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पाल्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना केला. या शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील ‘ज्ञानरचनावाद’ आणि शाळेमुळे परिवर्तन होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणार असल्याचे नमूद केले.
आई-वडील ऊस तोडणीला गेल्यानंतरही चिमुकल्या हाताने स्वयंपाक बनविला, पण शाळा बुडविली नाही. खूप शिकून डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे, असा निर्धार ऊसतोड कामगारांच्या मुलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोडपणे त्यांनी उत्तरे देऊन सर्वांना चकित केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेश, शाळा उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, लातूर, नंदूरबार, धुळे, पुणे, ठाणे या सहा जिल्ह्यांतील आदिवासी, दुर्गम, तांड्यावरील शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे थेट संवाद साधला. दुपारी २ वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवात झाली.
मुले ऊसतोडीला गेली नाहीत
तांडा व परिसरातील एकही मूल यंदा ऊसतोडीला गेले नाही. आजी-आजोबाजवळ राहून चिमुकल्यांनी स्वत: स्वयंपाक करून शाळेत हजेरी लावली. कोमल राठोड या विद्यार्थिनीस मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केला, तुला शाळेत काय आवडते? ती म्हणाली की, सौरऊर्जेवर ई-लर्निंगचे शिक्षण मिळते, शाळेत बँक सुरू केली, बाग फुलविली, खेळणी, फुले यामध्ये आमचा दिवस जातो. शिक्षक चांगले शिकवीत असून, ज्ञानरचनावाद उपक्रमातून खूप शिकायला मिळते. वैशाली राठोड म्हणाली की, माझे आई-वडील ऊसतोडीचे काम करतात. पंरतु मी त्यांच्यासोबत जात नाही. मला इंग्रजी विषय आवडतो. घरी स्वयंपाक करून भावांना घेऊन मी शाळेत येते. मलाही डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे.
पालक अण्णा राठोड म्हणाले की, शिक्षकांनी सांगितलेले आम्हाला पटले. मुलांना ऊसतोडीसाठी सोबत नेले नाही, त्यांना शाळेत टाकले, तांड्यावरील कोणीही शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेतली. हिरामण राठोड म्हणाले की, आणखी १० वर्षे आम्ही ऊसतोडी करू, पण मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू.