४० हजार गरीब कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला ब्रेक? घरकुल योजना अडकली चौकशीच्या फेऱ्यात

By मुजीब देवणीकर | Published: December 16, 2022 12:26 PM2022-12-16T12:26:11+5:302022-12-16T12:26:24+5:30

औरंगाबाद शहरात पंतप्रधान आवास योजनेसाठी हर्सूल, चिकलठाणा, तिसगाव, सुंदरवाडी, पडेगाव येथे जागा देण्यात आली.

Break the dream of 40 thousand poor families' houses? Gharkul scheme stuck in round of inquiry | ४० हजार गरीब कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला ब्रेक? घरकुल योजना अडकली चौकशीच्या फेऱ्यात

४० हजार गरीब कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला ब्रेक? घरकुल योजना अडकली चौकशीच्या फेऱ्यात

googlenewsNext

औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला अजून सुरुवात झालेली नसताना ही योजना अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील दोन चौकशी समितींच्या फेऱ्यात आल्याने सुमारे ४० हजार गरिबांच्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न कागदावरच राहते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आधीच योजना मूर्त रूपात येण्यात काही वर्षे निघून गेली आहेत. औरंगाबादच्या तुलनेत इतर जिल्ह्यात या योजनेचे फळ सर्वसामान्यांना मिळाले. परंतु, औरंगाबाद शहरात या याेजनेला अजून सुरुवातच झालेली नाही.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी हक्काचे घर मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येते. औरंगाबाद शहरात योजनेसाठी हर्सूल, चिकलठाणा, तिसगाव, सुंदरवाडी, पडेगाव येथे जागा देण्यात आली. दिशा समितीमध्ये आवास योजनेबाबत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात मुंबईत वरिष्ठ पातळीवर बैठक झाली. कंत्राटदार आणि स्थानिक प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांनी कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. असे असतानाही योजनेच्या चौकशीचा घाट घातला गेला आहे. यंत्रणेतील काही मंडळींना हे काम ठप्प पाडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची इच्छा आहे. ते काम घेण्यासाठी काही राजकीय मंडळीच्या संपर्कातील कंत्राटदार सरसावल्याची चर्चा आहे. जुनी निविदा प्रक्रिया गुंडाळली तर नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी बराचसा काळ जाईल. परिणामी योजनेचे काम लांबणीवर पडेल.

जागा मिळाली पण पुढे काहीच नाही...
हर्सूल, चिकलठाणा येथील अतिक्रमण काढून देणे गरजेचे होते; तसेच सुंदरवाडी येथील जागेत अंशत: अतिक्रमण असून ९ वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण आहे. तिसगावमध्ये ३० टक्के क्षेत्र अतिक्रमित असून, त्या भागात पक्की घरे बांधण्यात आली आहेत. या जागेवर ७० टक्के डोंगराळ भाग आहे. २० टक्के जागेतच घरकुलांचे काम होणे शक्य आहे. पडेगाव येथे देखील काही प्रमाणात अतिक्रमण आहे.

किती व कुठे दिली जागा ?
घरकुल योजनेसाठी ६० हेक्टर पैकी १९ हेक्टर जागा प्रशासन पालिकेला देऊ शकले. शहरालगत फक्त ४२ हेक्टर जागा प्रशासनाकडे असून, २३ हेक्टर अतिक्रमित आहे. १९ हेक्टर जागा फेब्रुवारी २०२२ मध्ये दिली आहे. १८ हेक्टर जागा योजनेसाठी कमी असून योजनेसाठी १ रुपया चौरस मीटर दराने जागा दिली आहे. १ लाख ८२ हजार ३०० रुपये चालान पालिकेने भरल्यानंतर जागेचा करार करून सनद पालिकेला देण्यात आली आहे. हर्सूलमध्ये १ हेक्टरसाठी १० हजार २००, पडेगावमध्ये ३ हेक्टरसाठी २१ हजार ६००, तर तिसगावमधील १५ हेक्टरसाठी १ लाख ५० हजार ५०० असे १९ हेक्टर जमिनीसाठी १ लाख ८२ हजार ३०० रुपये चालान भरण्यात आले.

ठिकाण---------घरकुल संख्या-----घरांची किंमत
पडेगाव---------७२८-------------------९ लाख ६८ हजार
हर्सूल----------५६०--------------------८ लाख ८४ हजार
सुंदरवाडी, चिकलठाणा, तीसगाव ---३८७१२----८ लाख ९७ हजार

Web Title: Break the dream of 40 thousand poor families' houses? Gharkul scheme stuck in round of inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.