दुकान फोडून चोरट्यांनी पावणेदोन लाखाच्या सिगरेट पळवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:52 PM2019-06-12T17:52:08+5:302019-06-12T17:55:34+5:30
दुकानाच्या लॉक पट्ट्या तोडून चोरट्यांनी केला आत प्रवेश
सिल्लोड (औरंगाबाद ) : शहरातील भगतसिंग चौक येथील सिगारेट व तंबाखू विक्री करणारे दुकान चोरट्यांनी मंगळवारी (दि.११) मध्यरात्री फोडले. यावेळी चोरट्यांनी २ लाख ३० हजारांची रोख रक्कम आणि मुद्देमाल लंपास केला.
अधिक माहिती अशी की, शहरातील भगतसिंग चौक येथे इरफान अहेमद अनीस अहेमद देशमुख यांचे सिगारेट व तंबाखू विक्री करण्याचे दुकान आहे. मंगळवारी रात्री इरफान देशमुख नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी गेले. आज सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरच्या दोन्ही बाजुच्या लॉक पट्ट्या कापल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शटरवर करून पाहणी केली असता त्यातील सामान विखुरलेले होते. यानंतर देशमुख यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. सपोनी संतोष तांबे, गहिनीनाथ गीते यांनी घटनास्थळी भेट दिली.
चोरट्यांनी सिगारेट व तंबाखू असा १ लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल आणि ५५ हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे. देशमुख यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम ४५७,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संतोष तांबे, गहिनीनाथ गीते करत आहेत.