टपरी फोडणे जीवावर बेतले; चोरी करण्यासाठी गेला अन् भाजून जखमी झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:21 PM2020-09-14T15:21:53+5:302020-09-14T15:23:02+5:30
टपरीची वीज बंद असल्यामुळे उजेडासाठी चोरट्याने पुठ्ठा पेटवताच अचानक सॅनिटायझरचा भडका उडाला.
औरंगाबाद : चोरी करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला शनिवारी रात्री चांगलीच अद्दल घडली. दोन चोरट्यांनी टपरीची फळी उचकटली व एक जण आत घुसला. मात्र, टपरीची वीज बंद असल्यामुळे उजेडासाठी त्याने पुठ्ठा पेटवताच अचानक सॅनिटायझरचा भडका उडाला. बघता बघता टपरीतील सामानाने पेट घेतला आणि आत अडकलेला चोरटा आगीत भाजल्याने जोरजोरात ओरडू लागला. तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला बाहेर काढून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
ही घटना शनिवारी उशिरा रात्री शाहनूरमियाँ दर्गा चौकातील डीमार्टसमोर घडली. दरम्यान, टपरीला आग लागताच बाहेर असलेल्या साथीदाराने तेथून धूम ठोकली. या घटनेत १३ वर्षीय चोरटा ३० टक्के भाजला आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता टपरीमालक शेख फैयाज शेख हमीद हे टपरी बंद करून घरी गेले. बारा वाजेच्या सुमारास भारतनगर येथील रेकॉर्डवरील अल्पवयीन दोन सराईत चोरट्यांनी डीमार्टसमोरील टपरीची फळी उचकटून आत प्रवेश केला. एक जण बाहेर थांबला, तर आत गेलेल्या दुसऱ्या चोरट्याने टपरीत अंधार असल्याने पुठ्ठा पेटवला. त्यावेळी टपरीतील सॅनिटायझरचा एकदम भडका उडाला. या आगीत टपरीतील मास्क, रुमाल, फळ्या, माचिस, बिडी, सिगारेट आदींनी पेट घेतला. बघता बघता आग भडकल्याने चोरट्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसेना. त्यामुळे तोही या आगीत होरपळला.
योगायोगाने त्यावेळी तेथून गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर निघाले होते. त्यांनी हा प्रकार बघितला. आतून किंचाळण्याचा आवाजही ऐकला. त्यामुळे पोलिसांचे पथक तेथे थांबले व त्यांनी तात्काळ जवाहरनगर पोलिसांना ही घटना कळवली. माहिती मिळताच हवालदार निकम आणि बीट मार्शल सय्यद फहीम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत टपरीमधील चोरट्याला बाहेर काढले. यात त्याचे दोन्ही हात, पाय आणि तोंड भाजले होते.
भाजलेल्या अवस्थेत त्यास घाटीत दाखल केले. आगीत टपरीतील माल आणि टपरी, असा एकूण ३० हजारांचा ऐवज जळून खाक झाला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.