पूर्णा-नेवपूर प्रकल्पाच्या वळण भिंतीला पुन्हा भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:05 AM2021-09-21T04:05:27+5:302021-09-21T04:05:27+5:30
विशेष म्हणजे उन्हाळ्यातच लाखोंचा खर्च करून सिंचन विभागाने या भिंतीची दुरुस्ती केली होती; मात्र भिंतीला दगडाचे पिचिंग न ...
विशेष म्हणजे उन्हाळ्यातच लाखोंचा खर्च करून सिंचन विभागाने या भिंतीची दुरुस्ती केली होती; मात्र भिंतीला दगडाचे पिचिंग न केल्याने हा मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. या भिंतीला लागून असलेल्या २० शेतकऱ्यांच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने आतातरी याकडे लक्ष देऊन भिंतीची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चिंचोली लिंबाजीसह पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीनवेळा अतिवृष्टी झाली. पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. गेल्या वीस वर्षांतील सर्वात मोठा पूर आला होता. सततच्या मुसळधार पावसाने व अतिवृष्टीने नेवपूर परिसरातील नदीकाठची शेती मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. या पुराचा सर्वाधिक फटका सांडव्यावरून निघणारे पाणी वाहून नेणाऱ्या संरक्षक वळण भिंतीला बसला आहे. या भिंतीचा मातीचा भराव वाहून गेल्याने भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळे नदीपात्रच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी सुधाकर काथार, प्रभाकर काथार, रंगनाथ काथार आदी शेतकऱ्यांनी केली.
-----
आम्ही पाण्याचा प्रवाह भिंतीला धडकू नये म्हणून उन्हाळ्यात तांत्रिक विभागाकडून पोकलेनच्या सहाय्याने नदीपात्रात चारी करून भिंतीच्यालगत भराव टाकला होता; मात्र नदीला मोठा पूर आल्याने हा भराव वाहून गेला आहे. सुधारित अंदाजपत्रकाला मान्यता मिळताच या भिंतीची दुरुस्ती करण्यात येईल.
- जी. बी. ताजी, शाखा अभियंता, पूर्णा नेवपूर प्रकल्प
----
फोटो : पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याचे पाणी वाहून नेणाऱ्या वळण भिंतीला असे भगदाड पडले आहे.
200921\img-20210905-wa0191.jpg
कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याचे पाणी वाहून नेणाऱ्या वळण भिंतीला असे भगदाड पडले आहे.......छाया प्रशांत सोळुंके
कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याचे पाणी वाहून नेणाऱ्या वळण भिंतीला असे भगदाड पडले आहे.......छाया प्रशांत सोळुंके