मोकळा श्वास! चंपा चौक ते जिन्सी रोडवरील राजकीय पक्षांची कार्यालये, हॉटेल्सवर हाताेडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 08:38 PM2023-01-20T20:38:29+5:302023-01-20T20:39:29+5:30
महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीने चंपा चौक ते जिन्सी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे.
औरंगाबाद : शहरातील चंपा चौक ते जिन्सी, रेंगटीपुरा चौक डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे गुरुवारी काढण्यात आली. राजकीय पक्षांच्या कार्यालयासह अनेक हॉटेल्स, विविध व्यवसाय अतिक्रमणामध्ये सुरू होते. महापालिकेने त्या सर्व अतिक्रमणांवर गुरुवारी हातोडा मारला. पाडापाडी सुरू असताना नागरिकांनी विरोध केला. काही काळासाठी तणावसदृश वातावरण झाले होते.
महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीने चंपा चौक ते जिन्सी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या ८० फूट विकास आराखड्यातील रस्त्यावरील ८० अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्यात आला. काही नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली होती. या अतिक्रमणामध्ये १५ बाय १५, दहा बाय पंधरा आकाराची दुकाने बांधली होती. काही नागरिकांनी लोखंडी शेड्स उभारले होते. त्यात विविध व्यवसाय सुरू केले होते. काही राजकीय पक्षांची कार्यालये होती. अतिक्रमणधारकांना सूचना देत पंधरा दिवसांपूर्वीच मार्किंग केले होते. आपले अतिक्रमण बांधकाम स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहन मनपाने केले होते. परंतु काही नागरिकांनी सदर जागा मंडळाची असल्याचे सांगितले. तसेच काहींनी न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे असल्याने ती काढण्यात आली. प्रशासकांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, पोलिस निरीक्षक फइम हाश्मी, इमारत निरीक्षक मझहर अली, आर. एम. सुरासे, सय्यद जमशेद, पंडित गवळी, पोलिस कर्मचारी, विद्युत विभाग कर्मचाऱ्यांचा कारवाईत सहभाग होता.
सकाळपासूनच पाडापाडी
पथकाने सुरुवातीला चंपा चौक येथील चंपा मस्जिदलगत असलेले दहा ते बारा अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने पाडण्याचे काम सुरू केले. यामुळे इतर लोकांनीही स्वतःहून सदर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. नंतर सायंकाळपर्यंत ही सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. सुरुवातीला तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते.