श्वासाची दोरी अम्बू बॅगवरच
By Admin | Published: June 28, 2017 12:25 AM2017-06-28T00:25:39+5:302017-06-28T00:29:12+5:30
नांदेड: विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका व्हेंटीलेटरवर रुग्णालयाचा कारभार सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजघडीला उपलब्ध असलेल्या एका व्हेंटीलेटरचा संगीत खुर्चीचा खेळ सुरु असून एकाच दिवशी अनेक रुग्णांकडे हे व्हेंटीलेटर फिरवावे लागत आहे़ प्रत्यक्षात दहा व्हेंटीलेटरची आवश्यकता असताना, एका व्हेंटीलेटरवर रुग्णालयाचा कारभार सुरु असून अत्यवस्थ रुग्णांना अम्बू बॅगवरच ठेवण्यात येत आहे़
डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण करण्यात आले़ त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन अत्याधुनिक सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या़ येथील आयसीयू आणि एसआयसीयू या दोन्ही विभागात आजघडीला ३० हून अधिक खाटा असून रुग्णसंख्याही तेवढीच आहे़ या सर्व रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास आवश्यक असतो़ सुरुवातीचे काही दिवस या ठिकाणी पाच व्हेंटीलेटर होते़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवून इतर रुग्णांना अम्बु बॅगद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता़ त्यातही रुग्णालय प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत होती़ परंतु मध्यंतरी पाचपैकी तीन व्हेंटीलेटर नादुरुस्त झाले़
त्यामुळे दोन विभागांसाठी दोनच व्हेंटीलेटर उपलब्ध होते़ त्यामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन उसनवारीवर बाहेर जिल्ह्यातून व्हेंटीलेटर आणण्यात आले होते़, परंतु त्यांनीही ते आता परत नेले आहेत़ त्यामुळे सध्या रुग्णालयात एकच व्हेंटीलेटर उपलब्ध आहे़ हेच व्हेंटीलेटर दोन्ही विभागात फिरवावे लागते़ तर इतर अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती अम्बु बॅग देवून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येतो़ नातेवाईकांकडून अम्बू बॅगला दाब देण्यात थोडीही ढिलाई झाल्यास रुग्णाच्या जीवितावर बेतू शकते़ एवढ्या गंभीर प्रकाराबाबत मात्र वैद्यकीय प्रशासनाला कुठलेच गांभीर्य नाही़
रुग्णालयाला अधिकचे व्हेंटीलेटर देण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत़ मुंबई येथील सिद्धीविनायक ट्रस्टकडूनही व्हेंटीलेटर देण्याची तयारी दाखविली होती़ त्यासाठीही महाविद्यालय प्रशासनाने प्रस्ताव पाठविला आहे, परंतु त्याचे पुढे नेमके काय झाले? हे कळायला मार्ग नाही़ त्यामुळे आजघडीला तरी, व्हेंटीलेटरचा संगीत खुर्चीचा खेळ रुग्णांच्या जिवावर बेतणारा ठरु शकतो यात शंका नाही़