घरपट्टीचे पुनर्मूल्यांकनासाठी मागितली लाच; मनपाचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 07:09 PM2022-02-22T19:09:34+5:302022-02-22T19:09:46+5:30
लिपिकाविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद : घराच्या मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. सोहेल पठाण फेज अहेमद पठाण (५२, रा. नवाबपुरा) असे अटकेतील लिपिकाचे नाव आहे.
लिपिकाविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. महापालिकेच्या सेंट्रल नाका येथील वॉर्ड कार्यालयातील मालमत्ता कर विभागात तो कार्यरत आहे. डिसेंबर महिन्यात पठाण तक्रारदाराच्या घरी गेला हाेता. तेथे त्याने तुमच्या घराला चुकीच्या पद्धतीने कमी कर लावण्यात आला आहे. यामुळे तुमच्या घरपट्टीची फेररचना करण्यासाठी पुनर्मूल्यांकन (रिवाईज) करणार असल्याचे सांगितले. तक्रारदारांनी त्यांच्या घराला महापालिकेने नियमानुसार कर लावलेला आहे. तसेच ते नियमित मालमत्ता कर भरतात, असे सांगितले. यानंतरही पठाण लाचखोरीच्या उद्देशाने अनेकदा त्यांच्या घरी गेला आणि तुमच्या इमारतीचे पुनर्मूल्यांकन करतो, असे म्हणाला. पुनर्मूल्यांकन करायचे नसेल तर १० हजार रुपये लाच त्याने मागितली.
तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १६ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्याच दिवशी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हाही त्याने दहा हजार रुपये लाच मागितली. मात्र नंतर त्याला संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेतली नाही. शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ फेब्रुवारी रोजी आरोपी पठाणला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर यांनी केली. त्यांना पोलीस अंमलदार रवींद्र काळे, भीमराज जिवडे, विनोद आघाव, चंद्रकांत बागूल यांनी मदत केली.