औरंगाबाद महापालिकेत लाचखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:15 AM2018-09-08T00:15:09+5:302018-09-08T00:16:57+5:30
विनापरवानगी घराचे बांधकाम करू देण्यासाठी आणि जप्त साहित्य परत करण्याकरिता एका जणाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागप्रमुख आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी दुपारी महानगरपालिका कार्यालयात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विनापरवानगी घराचे बांधकाम करू देण्यासाठी आणि जप्त साहित्य परत करण्याकरिता एका जणाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागप्रमुख आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी दुपारी महानगरपालिका कार्यालयात झाली.
अतिक्रमण विभाग प्रमुख छबूलाल म्हातारजी अभंग (५५) आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे (३२), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले की, तक्रारदारांच्या मुलीचे बीड बायपास परिसरात घराचे बांधकाम सुरू आहे. मनपाची परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याचे कळताच अतिक्रमण हटाव पथक विभाग प्रमुख अभंग, आवेक्षक दुबे हे काही दिवसांपूर्वी तेथे गेले. त्यावेळी त्यांनी तातडीने बांधकाम थांबविण्याचे आदेश देत तेथील बांधकाम साहित्य जप्त केले होते. त्यानंतर तक्रारदारांनी अभंग आणि दुबे यांची भेट घेतली आणि बांधकाम सुरू ठेवू द्या, जप्त साहित्य परत करा, अशी विनंती केली. त्यावेळी आरोपींनी तक्रारदारांकडे ७५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, नितीन देशमुख, कर्मचारी विजय ब्राह्मंदे, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, दिगंबर पाठक , चालक संदीप चिंचोले यांनी दोन पंचांसह तक्रारदारांना आरोपींकडे पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी तडजोडीअंती आरोपी अभंगने ५० हजार रुपयांची लाच आरोपी दुबेकडे देण्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महानगरपालिका कार्यालय परिसरात दुपारी सापळा रचला. यावेळी अभंग याच्यासाठी आरोपी दुबेने तक्रारदाराकडून लाचेचे ५० हजार रुपये घेतले. आरोपींनी लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
वर्षभरात दीड हजारांहून अधिक तक्रारी
अनधिकृत बांधकाम पाडू नये म्हणून लाच घेणे, तक्रारदाराकडूनही कारवाईसाठी लाच घेण्याचे प्रकार मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले आहेत. अनधिकृत बांधकामांची संख्या तब्बल ५ हजारांहून अधिक आहे.
महापालिकेत गाजलेली लाच प्रकरणे : तत्कालीन मुख्य लेखाधिकारी स्व. महेंद्र खैरनार, कनिष्ठ अभियंता बी.के. गायकवाड, आर.पी. वाघमारे, लिपिक श्रीकांत, सहायक आयुक्त प्रियंका केसरकर यांच्या शिपायाने लाच घेतली होती; मात्र केसरकर यांचा त्याच्याशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाले होते. अलीकडेच उपायुक्त अय्युब खान, लिपिक लाहोटी यांच्यावरही तसाच आरोप आहे.