बांधकाम परवानगीसाठी घेतली लाच; एसीबीने सिडकोच्या लिपिकास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 12:21 PM2021-04-02T12:21:04+5:302021-04-02T12:23:51+5:30
CIDCO clerk in the custody of ACB सिडको वाळूज महानगरातील तक्रारदार यांना जुन्या घराच्या जागेवर नवीन बांधकाम करायचे असल्याने त्यांनी सिडकोच्या वाळूज कार्यालयात बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता.
वाळूज महानगर : घराच्या बांधकाम परवानगीसाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या सिडको वाळूज महानगर कार्यालयातील लिपिकास लाच प्रतिबंधक पथकाने गुरुवारी (दि.१) पकडले. संतोष दौलत जाधव (३५) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
सिडको वाळूज महानगरातील तक्रारदार यांना जुन्या घराच्या जागेवर नवीन बांधकाम करायचे असल्याने त्यांनी सिडकोच्या वाळूज कार्यालयात बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सिडको कार्यालयातील लिपिक संतोष जाधव याने परवानगी देण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली. संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लिपिक जाधव यास पकडण्यासाठी गुरुवारी सापळा रचला होता. तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारताच लिपिक संतोष जाधव यास पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई एलसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक बी. व्ही.गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोहेकॉ. मिलिंद उपर, पो.ना.रवींद्र काळे, चालक चांगदेव बागुल आदींनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.