लोंबकळलेल्या स्वीच बोर्डाला विटांचा आधार; जिल्हा रुग्णालयात रुग्णांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 07:57 PM2021-01-12T19:57:29+5:302021-01-12T19:59:26+5:30
Mini Ghati Civil Hospital Aurangabad जिल्हा रुग्णालयाच्या इलेक्ट्रिक ऑडीटच्या दाव्याची पोलखोल
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय. साधारण तीन वर्षांपूर्वीच्या नव्याकोऱ्या, चकाचक इमारतीत कुठे विद्युत वायर लोंबळकत आहे, तर कुठे स्वीच बोर्ड, तर कुठे वायरला चिकटपट्टीची ठिगळपट्टी. सुदैवाने सध्या येथे एकही रुग्ण नाही, पण गेली नऊ महिने कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही घडले असते तर...विचार केलेलाच नको. याठिकाणी २०१९ मध्ये इलेक्ट्रिक ऑडिट झाले, पण त्यानंतर या ऑडिटचा विसर. भंडारा येथील दुर्घटनेमुळे आता इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची जाग आली आहे.
भंडारा येथे नवजात शिशुंचा बळी घेणाऱ्या दुर्घटनेने प्रत्येकाचे मन हळहळले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील जिल्हा रुग्णालयात इलेक्ट्रिक तज्ज्ञांसह ‘लोकमत’ने पाहणी केली. तेव्हा काही बाबी निदर्शनास पडल्या. रुग्णालय प्रशासनाच्या दृष्टीने त्या किरकोरळ ठरत असल्या तरी रुग्णांसाठी छोटीशीही स्पार्किंग जीवघेणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा रुग्णालयात २५ जून २०१८पासून ओपीडी सेवा करण्यात आली होती. त्यानंतर अन्य विभाग कार्यान्वित झाले. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर इतर सर्व उपचार बंद करून याठिकाणी केवळ कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने याठिकाणी आजघडीला याठिकाणी एकही रुग्ण दाखल नाही. मंगळवारपासून येथे पुन्हा ओपीडी सुरू होणार आहे.
पाहणीत काय आढळले ?
रुग्णालयात पहिल्या मजल्यावर विद्युत वायर चिकटपट्टीने जोडण्यात आलेले दिसले. दुसऱ्या मजल्यावर एका वॉर्डात वायरसह लोंबकळलेल्या अवस्थेत स्वीच बोर्ड पहायला मिळाला. धक्कादायक म्हणजे या बोर्डाची दुरुस्ती करण्याऐवजी विटांचा थर रचून त्याला आधार देण्यात आला आहे. तळमजल्यावर विद्युत खोलीत गुंतागुंत अवस्थेत वायर, केबल्स होत्या. याठिकाणी दोन कॅन पहायला मिळाल्या. त्यात काय होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. काही ठिकाणी टुबलाइटची वायर व टुबलाइटही लोंबकळत आहे.
ऑडिट न करण्यास जबाबदार कोण?
ऑडिट नेमके कधी करायचे, याची वेगवेगळी उत्तरे दिली जातात. रुग्णालयात २०१९ मध्ये सिटी स्कॅन कार्यान्वित करताना हे इलेक्ट्रिक ऑडिट केल्याचा दावा केला जातो. रुग्णालय प्रशासन, आरोग्य उपसंचालक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे फक्त एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात.
पुन्हा इलेक्ट्रिक ऑडिट करणार
रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट २०१९ मध्ये झालेले आहे. आता पुन्हा एकदा या ऑडिटसह फायर ऑडिट केले जाईल. रुग्णालयाची इमारत नवीन आहे. त्यामुळे विद्युत वायरिंगही फार जुनी नाही.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
रुग्ण रुग्णालयात स्वत:ला किती सुरक्षित समजतात?
- रुग्णालयात नुकतेच कोरोनाचे उपचार घेतले. उपचार चांगले मिळाले. रुग्णांसाठी औषधोपचार तर महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबत रुग्णालयातील विद्युत उपकरणे आणि सुरक्षा व्यवस्थाही चांगली पाहिजे. - कोरोनामुक्त रुग्ण
- भंडारा येथील दुर्घटना स्पार्किंगमुळे झाल्याचे समजते. रुग्णालयात उपचार घेताना विद्युत वायर, बोर्डकडे फारसे लक्ष जात नाही. या गोष्टींच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असेल तर उपचार घेताना स्वत:ला किती सुरक्षित समाजावे? असा प्रश्न आहे. - काेरोनामुक्त रुग्ण