राज्यमार्गावरील पूल बनला वाहतुकीसाठी धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:52 PM2017-08-14T23:52:45+5:302017-08-14T23:52:45+5:30
राज्य मार्गावरील कठडे तुटून अनेक वर्षे उलटले तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे. सतत रहदारी असणारा तो पूल धोकादायक बनला
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : राज्य मार्गावरील कठडे तुटून अनेक वर्षे उलटले तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे. सतत रहदारी असणारा तो पूल धोकादायक बनला असून, त्याला तात्काळ नवीन पाईप टाकून कठडे बसवावेत, अशी मागणी राष्टवादीचे युवानेते दादासाहेब गव्हाणे यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातून जाणाºया राज्य मार्गावरील कडा येथील कडी नदीवर जुना पूल आहे. या पुलावरून वाहने जाताना येताना सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारलेले कठडे जुनी झाल्याने तुटले आहेत, तर लोखंडी पाईप देखील मोडून पडले आहेत. याच पुलावरून लहान - मोठ्या व अवजड वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. अपघात घडू नयेत, घडले तर वाहने खाली जाऊ नयेत यासाठी संरक्षण म्हणून हे कठडे आणि लोखंडी पाईप लावलेले आहेत. मात्र, हे कठडे व लोखंडी पाईप अनेक वर्षापासून तुटल्याने पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ दुरूस्ती करावी. अन्यथा अपघात घडून जीवितहानी झाली तर संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी देखील मागणी दादासाहेब गव्हाणे यांनी केली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जी. टी. शिदे म्हणाले की, तालुक्यातील कठडे व पाईप तुटलेल्या पुलाची पाहणी करून नवीन बसवले जातील.