सिडको-म्हाडा कॉलनी मार्गावरील पुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 08:49 PM2019-01-08T20:49:35+5:302019-01-08T20:50:35+5:30
सिडको वाळूज महानगर १ ते म्हाडा कॉलनी मार्गे महानगर २ ला जोडणाऱ्या मार्गावरील पुलाचे काम प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक दिवसांपासून रखडले आहे.
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर १ ते म्हाडा कॉलनी मार्गे महानगर २ ला जोडणाऱ्या मार्गावरील पुलाचे काम प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक दिवसांपासून रखडले आहे. पुलाअभावी रस्त्याचा वापर करता येत नाही. लिंकरोड चौकातून वळसा घालून ये-जा करावी लागत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
सिडको प्रशासनाने मागील वर्षी जून-जुलैमध्ये महानगर १ मधून म्हाडा कॉलनी मार्गे महानगर २ ला जोडणाºया रस्त्याचे काम ठेकेदाराला दिले. हा रस्ता तीसगाव हद्दीतील नैसर्गिक नाल्यावरून जातो. प्रशासनाने रस्ता डांबरीकरणाचे काम करताना तात्पुरत्या स्वरूपात नाल्यावर नळ्या टाकून पूल तयार केला; पण पहिल्याच मोठ्या पावसात नाल्याला पाणी आल्याने अर्धा पूल वाहून गेला. रस्ता कामाला खोळंबा होऊ नये म्हणून पुलाची डागडुजी करण्यात आली. नाल्याच्या दोन्ही बाजूने १८ मीटर रुं द व जवळपास दीड किलोमीटर लांब रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्यात आला आहे; पण दोन्ही रस्त्याला जोडणाºया नाल्यावरील पुलाचे काम मात्र रखडले आहे.
याठिकाणी प्रशासनाकडून जवळपास ५० मीटर लांब व १८ मीटर रुंद पूल उभारणार आहे. यासंदर्भात या भागातील प्रा.भरतसिंग सलामपुरे, संजय जाधव, रामसिंग सलामपुरेसह आदी नागरिकांनी पुलाचे काम करावे यासाठी प्र्रशासनाकडे अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या आहेत; पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. रस्ता चांगला होऊनही ७-८ महिन्यांपासून पुलाचे काम रखडल्याने या रस्त्याचा वापर करता येत नाही. परिणामी सिडको वाळूज महानगर एकसह वडगाव, बजाजनगर भागातील वाहनधारकांना एएस क्लब लिंकरोड चौकातून दोन ते अडीच किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी एएस क्लब चौकात रस्त्याच्या दुतर्फा जड वाहने थांबत असल्याने वाहनधारकांना विशेषत: दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. विशेष म्हणजे येथील तीसगाव, म्हाडा कॉलनी, भारतनगर, सिद्धीविनायक विहार परिसरातील नागरिकांनादेखील पाच-दहा मिनिटांच्या अंतरासाठी लिंकरोड चौकाला वळसा घालावा लागत आहे. या विषयी सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पुलासह अन्य चार अशा पाच पुलांचे अंदाजपत्रक काढण्याची प्रक्रिया सुरूआहे. लवकरच निविदा काढून पुलांचे काम हाती घेतले जाणार आहे, असे लोकमतशी बोलताना सांगितले.