आतषबाजीने उजळले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:36 AM2017-10-20T00:36:16+5:302017-10-20T00:36:16+5:30
सुख-समृद्धी नांदावी यासाठी गुरुवारी घरोघरी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सुख-समृद्धी नांदावी यासाठी गुरुवारी घरोघरी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले. सायंकाळी दीपोत्सव व आतषबाजीने औरंगाबादनगरी उजळून निघाली. तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणाºया या दिवाळीने प्रत्येकाच्या हृदयात विवेकाचा दीप चेतविला. यानिमित्ताने शहरात सर्वत्र मांगल्य पसरले होते.
आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेरपूजन केले जाते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेनंतर लक्ष्मीपूजन करण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला होता. यानुसार दिवसभर पूजेच्या साहित्याची खरेदी जोमात राहिली. दुपारी ४ वाजेनंतर तरुणींनी व गृहिणींनी घराच्या अंगणात सुरेख रांगोळी काढण्यास सुरुवात केली. अनेक कॉलन्या व गल्ल्यांमध्ये जणू रांगोळी काढण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे दिसून आले. सर्वत्र सुरेख रांगोळीने अंगण सजले होते. घरात लक्ष्मी-कुबेरची पूजा मांडण्यात आली होती. कोणी लक्ष्मीची मूर्ती तर कोणी प्रतिमा ठेवली होती. आजूबाजूला चांदी व सोन्याचे सिक्के, को-या नोटांचे बंडल, लक्ष्मीचे छायाचित्र असलेल्या लाल रंगाच्या वहीपासून ते केरसुनी (झाडू) पर्यंत सर्व पूजेत मांडण्यात आले होते. घरातील पुरुष मंडळींनी पारंपरिक पद्धतीने गांधी टोपी घालून पूजेला सुरुवात केली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सर्व परिवार एकत्र आला होता. अनेक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धत असल्याने तीन ते चार भाऊ त्यांचा परिवार यानिमित्ताने जमा झाला होता. विधिवत पूजा झाल्यावर सर्वांनी एकत्रित देवीची आरती केली व त्यानंतर फटाक्याच्या आतषबाजीला सुरुवात झाली. सर्वांनी नवीन कपडे परिधान केले होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर नागरिक एकामेकांच्या घरी जाऊन ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ देताना दिसून आले. सिडको-हडकोतही दिवाळीची धूम होती. बच्चेकंपनीही प्रत्येकाच्या घरात जाऊन लक्ष्मीचे दर्शन घेत होते. घरातील ज्येष्ठ नागरिक या मुलांना बत्ताशे, रेवड्या देत होते. ज्योतीनगर, उल्कानगरीतील काही अपार्टमेंटमध्ये लक्ष्मीपूजनाचा एकत्रित सोहळा ठेवला होता. लक्ष्मीपूजनानंतर फराळ व भोजनाचाही सर्वांनी एकत्रित आस्वाद घेतला. रात्री उशिरापर्यंत शहरवासीय आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले.
फटाक्यांची विक्री घटली
फटाक्यांचे स्टॉल शहरापासून दूर लागल्याने व महागाई लक्षात घेता यंदा फटाक्यांची विक्री ४० टक्कांनी घटली. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी फटाका बाजारात तुरळक ग्राहकी दिसून आली. आज लक्ष्मीपूजनामुळे दुपारी अयोध्यानगरी, गरवारे स्टेडियम परिसर व बीड बायपास रोडवरील फटाका मार्केटमध्ये थोडी गर्दी दिसून आली.
रात्री लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली; पण पूर्वीसारखा दणदणाट दिसून आला नाही. अनेकांनी कमी आवाजाचे फटाके वाजविणे पसंत केले, तर अनेकांनी फटाके फोडले नाहीत. अनेक लोेक असे होते की, त्यांनी लक्ष्मीपूजनापुरतेच मोजके फटाके आणले होते. याचा मोठा फटका फटाके विक्रेत्यांना बसला.