पूर्ण चंद्राच्या प्रकाशात उजळले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:58 PM2018-10-23T23:58:14+5:302018-10-23T23:58:56+5:30
पूर्ण चंद्राच्या शीतल प्रकाशाने शहर उजळून निघाले होते. अनेक घरांत मंत्रोच्चार सुरू होते, तर काही ठिकाणी परिवारांमध्ये गप्पांची मैफल रंगली होती.
औरंगाबाद : पूर्ण चंद्राच्या शीतल प्रकाशाने शहर उजळून निघाले होते. अनेक घरांत मंत्रोच्चार सुरू होते, तर काही ठिकाणी परिवारांमध्ये गप्पांची मैफल रंगली होती. मध्यरात्री केशर, चारोळीमिश्रित आटीव दुधाचा आस्वाद घेत साऱ्यांनी मंगळवारी कोजागरी पौर्णिमा साजरी केली.
अश्विनी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात आली. या दिवशी चंद्राचे शीतल किरण पडलेले केशर-चारोळीमिश्रित आटीव दूध पिण्याचा आनंदच काही और असतो. आजही त्याची प्रचीती शहरवासीयांना आली. पूर्वी जवाहर कॉलनी, ज्योतीनगर, सहकारनगर, टिळकनगर, उल्कानगरी, सिडको एन-८, एन-५, महाजन कॉलनी आदी भागातील अपार्टमेंटच्या गच्चीवर सर्व परिवार मिळून कोजागरी पौर्णिमा साजरी केली जात होती. मात्र, हळूहळू ही प्रथा कमी होताना आज प्रखरतेने जाणवले. आपल्या कुटुंबापुरतीच कोजागरी साजरी करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. अनेकांनी घरातच दूध आटवून नंतर गच्चीवर जाऊन किंवा अंगणात दुधाचे भांडे ठेवले होते. मध्यरात्री १२ वाजता चंद्राचे शीतल किरण त्या दुधावर पडले त्यावेळी चंद्राची पूजा व आरती करण्यात आली नंतर सर्वांनी दुधाचा आस्वाद घेतला. कोजागरीला कोण जागे आहे, हे पाहण्यासाठी लक्ष्मी देवी सर्वत्र फिरत असते, असे म्हटले जाते. यामुळे अनेक धार्मिक घरांमध्ये अख्खा परिवार देवीचा जाप, मंत्रोच्चार करताना दिसून आला. शहरातील काही नामवंत गायकांच्या घरी मात्र, गुरू-शिष्यांच्या गाण्याची मैफल रमली होती. काहींनी चक्क हॉटेलमध्ये जाऊन आटीव दूध पिण्याचा आस्वाद घेतला. जवाहर कॉलनी, सावरकर चौक, बजरंग चौक, टीव्ही सेंटर, औरंगपुरा, मछलीखडक आदी भागातील हॉटेलमध्ये गर्दी दिसून आली.
चौकट
तीन लाख लिटर दुधाची विक्री
शहरात दररोज पावणेदोन ते दोन लाख लिटर दुधाची आवक होत असते. आज दुधाची मागणी वाढली होती. पॅकिंगमधील तसेच सुटे दूधही मोठ्या प्रमाणात शहरात आले होते. दूध मुबलक असल्याने अनेकांनी सायंकाळनंतरच दूध खरेदी करणे पसंत केले. दूध व्यावसायिकांच्या माहितीनुसार मंगळवारी शहरात जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून आलेल्या तीन लाख लिटर दुधाची विक्री झाली.