आमचे सरकार आणा; आरक्षणाचा तिढा सोडवू; प्रकाश आंबेडकर म्हणतात,'‘फार्म्युला आहे पण...
By विजय सरवदे | Published: July 16, 2024 03:21 PM2024-07-16T15:21:26+5:302024-07-16T15:23:32+5:30
मनोज जरांगे पाटलांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवलीच पाहिजे. ते लढतील, अशी खात्री आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून द्या. आमचे सरकार आणा. आम्ही ओबीसी आरक्षणाला हात न लावता गरीब मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ. तो फाॅर्म्युला मी आता जाहीर करणार नाही. नाही तर हे राजकारणी त्याचा चुथडा करतील, असा सावध पवित्रा प्रकाश आंबेडकर यांनी रात्री सुभेदारी विश्रामगृह येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना घेतला.
मंगळवारी शहरापासून जवळ सावंगी परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या पंचायत समिती स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सोमवारी रात्री आंबेडकर शहरात दाखल झाले. तेव्हा माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या राज्यातील श्रीमंत मराठे हे गरीब मराठ्यांना जवळ करीत नाहीत. त्यांच्याशी सोयरीकही करीत नाहीत. मात्र, लोकसभा निवडणुकीत गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांना मतदान केले आणि ३१ निजामी खासदार निवडून आले. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवलीच पाहिजे. ते लढतील, अशी खात्री आहे.
हाके आणि वाघमारे हे उपोषणाला बसले होते तेव्हाच सामंजस्याची भाषा झाली असती, तर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद एवढा चिघळला नसता. नेते किंवा पक्षाचा प्रमुख अथवा मंत्री म्हणून शांततेच्या जबाबदाऱ्या असतात; पण, आमच्या तलवारीला गंज लागलेला नाही, अशी भाषा योग्य नाही. त्यामुळे आगीत तेल पडले, असे मला वाटते. मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जरांगे पाटलांची मागणी आहे, या मागणीला पाठिंबा आहे की नाही, असा लेखी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांकडून घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.